टाकळी हाजी : मी कृषी मंत्री असताना कांद्याचे भाव वाढले म्हणून लोकसभेत कांद्याच्या माळा घालुन फिरणारे भाजप वाले आता कांद्याच्या किमंती मातीमोल झाल्या असताना कुठे आहेत. असा सवाल माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी केला.
निघोज ता पारनेर येथे बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या नामकरण समारंभ तसेच आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने सात हजार मुला मुलीना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळेस पवार यांनी केंद्र सरकारच्या शेती विरोधी धोरणावर सडकुन टिका केली. या वेळी माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील, आमदार निलेश लंके, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, अशोक सावंत, घनश्याम शेलार, निघोज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, जीएस महानगर बॅकेचे अध्यक्ष सुमनताई शेळके यांच्यासह मोठ्या प्रमानात पदाधिकारी उपस्थित होते .
या वेळी शरद पवार म्हणाले की, कृषी प्रधान देशात सध्या शेतकरी वर्ग मोठ्या संकटामधून जात आहे. त्यांना सरकारने आधार देण्याची गरज आहे मात्र शासन कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष करीत असुन, संस्थानिकाच्या ताब्यातुन घेत एकसंघ देशाची निर्मिती झाली. मात्र पुन्हा ठराविक उद्योगपती निर्माण करून त्यांच्या रुपाने सरकार संस्थानिक निर्माण करतय का असा सवाल त्यांनी व्यक्त केला. कांद्याला एकरी ७० हजार रुपये उत्पादन खर्च होतो मात्र कांदा विकुन हातात तेवढेही मिळत नाही मग खर्च व घेतलेले कर्ज शेतकऱ्यांनी कुठून भरायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री यांची भेट घेऊन कांदा प्रश्नी लक्ष वेधणार असल्यांची ग्वाही शरद पवार यांनी उपस्थितांना देताच शेतकऱ्यांनी टाळ्याचा कडकडाट केला.