पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांत १११ सहायक प्राध्यापकांची पदे भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली, तसेच राेस्टर तपासणी हाेऊन अनेक महिने झाले तरी अद्याप विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापक भरतीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे प्राध्यापक भरतीला मुहूर्त केव्हा लागणार? प्रशासनाकडून दिरंगाई का हाेत आहे? असा संतप्त सवाल प्राध्यापक संघटनांकडून विचारला जात आहे.
राज्यातील १५ अकृषी विद्यापीठांमध्ये ६५९ पदांवर प्राध्यापक भरती करावी, याबाबत दि.७ ऑगस्ट २०१९ राेजी शासन निर्णय निर्गमित केला हाेता. काेराेना प्रादुर्भाव काळातील निर्बंध शिथिल केल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून नोव्हेंबर २०२२ मध्ये पुन्हा पदभरती सुरू करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला. दरम्यान, एक वर्षाच्या कालावधीत केवळ गाेंडवाना विद्यापीठात ३० सहायक प्राध्यापकांच्या जागांवर भरती प्रक्रिया पार पडली आहे, तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ७३ आणि राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठ ९२ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अद्यापही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिक्त जागांवर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.
प्राध्यापक भरतीसंदर्भात सप्टेंबरअखेर जाहिरात प्रसिद्ध करणार असल्याचे पुणे विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले हाेते. राज्यातील विद्यापीठांनी रिक्त असलेल्या सहायक प्राध्यापकांच्या जागा भराव्यात; अन्यथा राज्य सरकारविराेधात ‘तुमची दिवाळी, आमचं दिवाळं’ आंदाेलन छेडणार असल्याचे नेट-सेट पीएच.डी.धारक संघर्ष समितीच्या वतीने वतीने सांगण्यात आले.
लवकरच जाहिरात प्रसिद्ध करू
प्राध्यापक भरतीसंदर्भात जाहिरातीचा मसुदा तयार आहे. प्रशासकीय प्रक्रिया सुरू असून, येत्या काही दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.
-डाॅ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
...तर भरती प्रक्रिया रखडण्याची शक्यता
अकृषी विद्यापीठात १,१६६ जागा रिक्त आहेत. त्यापैकी ६५९ पदभरतीला परवानगी दिली आहे. राज्यातील विद्यापीठांनी जाहिरात प्रसिद्ध करण्यास विलंब केला, तर आगामी काळात आचारसंहितेमुळे भरतीप्रक्रिया रखडली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी.
-डाॅ. प्रमाेद तांबे, राज्य समन्वयक, नेट-सेट पीएच.डी.धारक संघर्ष समिती
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
मंजूर पदे / भरलेली पदे / रिक्त / पदभरतीस मान्यता
४०० / २०९ / १९१ / १११