पुणे : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना न्युमोनियाची लागण झाली होती. तसंच त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला होता. कोरोनातून त्या बऱ्या देखील झाल्या होत्या. पण न्युमोनियाची लागण झालेली असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यातही लता मंगेशकरांच्या आठवणींना उजाळा मिळाला. पुणे शहरात आल्यावर त्या निलायम टॉकीजच्या जवळील जवाहर हॉटेलमध्ये त्या मुक्कामी असायच्या अशी आठवण जवाहर हॉटेलचे मालक सुभाष सणस यांनी सांगितली.
सणस म्हणाले, 1966 ते 1971 च्या पाच वर्षांच्या काळात लतादीदी पुण्यात आल्यानंतर नीलायम टॉकीजच्या जवळील जवाहर हॉटेलमध्ये त्या मुक्कामी असायच्या. हॉटेलमध्ये त्यांच्या नावाने एक रूम नेहमी बुक असायची. पुण्याचे पहिले महापौर बाबुराव सणस यांच्याविषयी त्यांना आस्था होती. त्यांची ते आपुलकीने चौकशी करीत असे. 1971 नंतर लतादीदींनी पुण्यात स्वतंत्र फ्लँट घेतला. पुण्यात आल्यावर त्या तिथे मुक्क्कामी असायच्या. पण हा ॠणानुबंध कायम राहिला. पुण्या-मुंबईत त्यांच्या घरगुती कार्यक्रमांना सणस कुटुंबाला आवर्जून बोलवत असतं.