धायरी : सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयासाठी माणिकबाग, गोयल गंगा परिसरात नवीन इमारत बांधून दोन ते तीन वर्षे होत आली, तरी या इमारतीत क्षेत्रीय कार्यालयाचा कारभार येथे सुरू करण्यात आला नाही. यामुळे नवीन इमारतीत त्वरित क्षेत्रीय कार्यालय स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या महिलाप्रमुख संघटिका पल्लवी पासलकर यांनी पुणे महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सिंहगड रोड परिसरातील नागरिकांना आपल्या विविध कामांसाठी टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयात सात ते आठ किलोमीटर दूर वाहतूककोंडीतून यावे लागते. याचा प्रचंड मनस्ताप येथील नागरिकांना होत आहे.
याकरिता त्वरित हे कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात यावे, असे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात आले. अन्यथा, शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, समनव्यक भरत कुंभारकर पाटील, उपशहर प्रमुख जयसिंग दांगट, विभागप्रमुख नीलेश गिरमे, महेश पोकळे, संतोष गोपाळ, शिवाभाऊ पासलकर, अमोल दांगट, संग्राम गायकवाड, कौस्तुभ पुरंदरे, राधिका गिरमे, माधवी कालेकर यांच्या निवेदनावर सह्या आहेत.