पुणे :रेल्वे लेटचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी अनेकदा घेतला असणार, पण हा अनुभव नुकताच रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरडोश (Darshana Jardosh) यांना पुणे रेल्वे स्थानकावर आला. जरडोश ज्या रेल्वेने सुरतला जाणार होते ती दुहेरीकरणाच्या कामामुळे घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे सांगली व मिरज स्थानकावरून थांबवून ठेवण्यात आली. पुण्याला पोहोचण्यास दोन तास उशीर झाला.
रेल्वे राज्यमंत्री दोन दिवसांच्या पुणे विभागाच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्याकडे रेल्वेसह टेक्सटाईल मंत्रालयाचा कार्यभार आहे. त्यामुळे सातारा व महाबळेश्वर येथे बैठकीचे आयोजन केले होते. बैठक पूर्ण करून त्या चेन्नई -अजमेर एक्स्प्रेसने सुरतला जाणार होत्या. ही गाडी पुणे स्थानकावर सायंकाळी साडेसहा वाजता पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, त्या गाडीला दोन तास उशीर झाला.
गाडी साडेआठ वाजता पोहोचली. गाडीला उशीर होणार असल्याची कल्पना देण्यात आली. त्या थोड्या वेळ स्थानकावरच्या व्हीआयपी कक्षात थांबल्या. अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्या पुन्हा रेस्ट हाऊसकडे रवाना झाल्या. गाडी आल्यावर त्या पुन्हा आल्या. त्यांचा विशेष डबा अजमेर रेल्वे जोडल्यानंतर त्या सुरतच्या दिशेने रवाना झाल्या.