पुणे : पुणेकरांनी सोमवारच्या रात्री आकाशामध्ये चंद्र–शनीची पिधान युती पाहण्याचा आनंद लुटला. शनि पूर्वेकडील बाजूने चंद्रबिंबाआड गेला आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडला, हे दृश्य पुणेकरांनी टेलिस्कोपद्वारे पाहिले. रात्री ११.३० नंतर ही खगोलीय घटनेचे निरीक्षण करण्यात आले. त्यासाठी निगडी येथील सायन्स पार्कमध्ये नागरिकांसाठी सोय करण्यात आली होती.
चंद्र आणि शनी यांच्या पिधानाची दुर्मिळ घटना आकाशप्रेमींना सोमवारी दि.१४) मध्यरात्री पाहता आली. चंद्र आणि शनीची जोडी साध्या डोळ्यांनी दिसणार असली, तरी शनीला चंद्राने झाकण्याची घटना पाहण्यासाठी टेलिस्कोपची आवश्यकता पडली. पृथ्वीभोवती फिरत असताना चंद्र काही वेळा आकाशातील तारे, तसेच ग्रहांच्या समोरून प्रवास करतो. तेव्हा असे दृश्य अनुभवायला मिळते. पृथ्वी, चंद्र आणि एखादा ग्रह किंवा तारा जेव्हा एका रेषेत येतात, तेव्हा तो ग्रह किंवा तारा काही काळ चंद्रामागे लपल्याचे पहायला मिळते. खगोलशास्त्रीय भाषेत या घटनेला चांद्र पिधान (लुनार ऑकलटेशन) असे म्हटले जाते.
सोमवारी मध्यरात्री १२:१५ ते १:२५ या दरम्यान चंद्र आणि शनीचे पिधान आकाशप्रेमींना पाहायला मिळाले. रात्री १२ वाजून १६ मिनिटांनी चंद्राच्या अंधाऱ्या भागाकडून शनी चंद्रामागे जाताना दिसला. त्यानंतर रात्री एक वाजून २५ मिनिटांनी चंद्राच्या प्रकाशित भागाकडून शनी बाहेर पडतानाचे दृश्य सर्वांना मोहून टाकणारे होते. शनी पूर्णपणे चंद्रामागे जाण्याची घटना सुमारे ५० सेकंदाची होती.
पिधान म्हणजे काय ?
जेव्हा एक ग्रहगोल दुसऱ्याला झाकतो तेव्हा त्या स्थितीला पिधान, असे म्हणतात, अशी माहिती खगोल अभ्यासकांनी दिली. सोमवारी मध्यरात्री चंद्राने शनीला झाकले. रात्री साडेअकरानंतर शनि आणि चंद्र एकमेकांच्या जवळ येताना दिसले. मग चंद्राने हळूहळू शनिला आपल्या मागे झाकण्यास सुरवात केली. त्यानंतर सुमारे तासाभरानंतर शनि चंद्राआडून बाहेर येताना दिसला.
पावसाळ्यानंतरचे हंगामातील पहिले आकाशदर्शन आम्ही पाहिले. सध्या आकाशात पश्चिम क्षितिजावर सुचिंशान-ॲटलास नावाचा धुमकेतू सूर्यास्तानंतर दिसतो आहे. तसेच तेजस्वी शुक्र सुध्दा पश्चिम क्षितिजावर दिसतो. पूर्व क्षितिजावर शनी दिसत आहे आणि परवा चंद्रही होता. सायन्स पार्कमध्ये आकाश निरभ्र असल्यास शनिवार-रविवारी आकाश दर्शानाचा कार्यक्रम आम्ही राबवतो. सोमवारी मध्यरात्री दुर्बिणीतून शनी, त्याची कडी आणि चंद्र पाहता आला. - सोनल थोरवे, खगोलअभ्यासक, सायन्स पार्क, पिंपरी चिंचवड