पिंपरी : एसटीचा प्रवास सुलभ व्हावा अन् प्रवाशांना ऑनलाइन पेमेंट करता यावे, यासाठी महामंडळ अँड्रॉइड मशीन उपलब्ध करून देणार होते; मात्र अद्याप या मशीन मिळाल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांसह वाहकांंनाही या मशीनची प्रतीक्षा लागली आहे.
एसटीचा प्रवास करताना सुट्ट्या पैशांसाठी वाहक व प्रवासी यांच्यात नेहमीच वाद होतात. याचा परिणाम कधी कधी हाणामारीपर्यंत जातो. त्यामुळे ही समस्या सोडविण्याच्या उद्देशाने, एसटी महामंडळाने अँड्रॉइड मशीन देण्याचे नियोजन केले आहे. या मशीनमुळे प्रवाशांना तिकिटाची रक्कम थेट ऑनलाइन देता येते. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या मशीन उपलब्ध झाल्या असल्या तरी पुणे जिल्ह्यात मात्र अद्यापही या उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे जुनी समस्या कायम आहे. प्रवाशांना सुटे पैसे घेऊनच प्रवास करावा लागत आहे.
अँड्रॉइड मशीनच उपलब्ध नाही
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या मशीन आल्या आहेत. त्याचा प्रत्यक्ष वापर सुरू झाला नसून, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. पुणे जिल्ह्यात अद्याप मशीन उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे अजून काहीकाळ या मशीनची वाट बघावी लागेल.
ना कार्ड पेमेंट, ना गुगल पे, फोन पे
सध्याच्या डिजिटल युगात सर्वच ठिकाणी ऑनलाइन पेमेंटची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे एसटीत नव्याने उपलब्ध होणाऱ्या या मशीनद्वारे कार्ड पेमेंट करता येणार आहे. जिल्ह्याला मशीन उपलब्ध झाल्या नसल्याने सध्यातरी कार्ड पेमेंट, गुगल पे, फोन पे यासारख्या डिजिटलचा वापर प्रवाशांना करता येत नाही.
मोफत प्रवास; त्यांनाही शून्य रकमेचे तिकीट
एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना सवलत जाहीर केली आहे. त्यांच्यासाठी मोफत प्रवास असला तरी त्यांना शून्य रकमेचे तिकीट देण्यात येत असून त्यावर अमृत महोत्सव ज्येष्ठ नागरिक सवलत असे लिहिलेले असते.