मोशी : मोशी मुख्य चौकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहच नसल्याची बाब समोर आली असून, पालिकेत समावेश होऊन कित्येक वर्षे उलटूनही अद्याप साधा महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न पालिका प्रशासनाला सोडवता आलेला नाही. तसेच सध्या पावसाळा सुरूअसून, स्वच्छतागृहाअभावी सामान्यांचे हाल होत असल्याचे दिसून येते.महिलांच्या आरोग्याशी निगडित हा मोठा प्रश्न असून, त्याची दखल संबंधितांनी घ्यावी व याबाबत योग्य ती कार्यवाही करून महिलांची व विद्यार्थिनींची गैरसोय दूर करावी. केवळ जागा नाही म्हणून शांत बसण्यापेक्षा जागा उपलब्ध करून स्वच्छतागृह बांधणे व त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे आहे. देहू-आळंदी रस्ता व पुणे-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या या चौकात पालिकेची शाळा, उपाहारगृहे गावठाण परिसर, ग्रामदैवत मंदिर, भाजी मंडई अशी वर्दळीची ठिकाणे असून, या चौकात दिवसभर नागरिकांची ये-जा होत असते. माऊली-तुकोबांच्या पदस्पर्शाने व नागेश्वरमहाराजांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या मोशी उपनगरामध्ये अशा प्रकारची किरकोळ गैरसोयही दूर होत नसल्याने ती निश्चितच खेदाची बाब आहे. याबरोबरच मध्यंतरी एसटी महामंडळाकडून मोशी येथील थांबा मध्यवर्ती विनंती थांबा घोषित करण्यात आल्याने त्याही प्रवाशांची गर्दी असते. यामुळे या गजबजलेल्या ठिकाणची महत्त्वाची गरज म्हणजे स्वच्छतागृह होय. परंतु, या महत्त्वपूर्ण गोष्टीकडे सर्वच लोकप्रतिनिधी काणाडोळा करताना दिसून येत आहे. पुरुष प्रवाशी एखादी आडोशाची जागा पाहून वेळ निभावून नेतात. मात्र, या बाबतीत महिला व मुलींची गैरसोय होते आणि यामुळे त्यांच्या मनाची होणारी घालमेल कदाचित लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचणारी नसावी. अन्यथा इतक्या वर्षातदेखील हा सामान्य प्रश्न सुटायचा राहिला नसता. केवळ जागा नाही असे म्हणून शांत बसण्यापेक्षा त्यासाठी योग्य पाठपुरावा करून स्वच्छतागृह उभारण्याची आवश्यकता आहे. असे नागरिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
मोशीकरांचा स्वच्छतागृहाचा प्रश्न सुटणार तरी केव्हा?
By admin | Published: October 12, 2016 1:59 AM