केडगाव : खुटबाव (ता. दौंड) येथील शेतकरी हनुमंत थोरात यांच्या खुनाचा शोध यवत पोलिसांनी तत्परतेने लावल्याबद्दल खुटबाव ग्रामस्थांनी यवत पोलिसांचा गौरव केला. या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी पोलिसांच्या गौरवपर संबोधन केले.
थोरात म्हणाले की, ‘या सत्काराने यवत पोलिसांना काम करण्याची नवीन ऊर्जा मिळेल. यवत पोलिसांचा कारभार नि:पक्षपणे चालला आहे. पोलीस निरीक्षक सूरज बंडगर म्हणाले की, शेतकरी व गुºहाळचालकांनी आपल्याकडे काम करणाऱ्या परप्रांतीय कामगाराची माहिती ठेवावी, त्याची माहिती नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवावी. थोरात हत्याकांड तपास यंत्रणेत सरपंच शिवाजी थोरात व खुटबाव ग्रामस्थांनी मोलाची भूमिका बजावली.’ या वेळी सरपंच शिवाजी थोरात यांनी सलग ३ दिवस यवत पोलिसांनी तहानभूक व वेळ विसरून गुन्हेगार कसे शोधले याची माहिती ग्रामस्थांना दिली.या वेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, नितीन दोरगे, उपसरपंच विजया थोरात,भाऊसाहेब ढमढेरे, शरद शेलार, पोपट कांबळे, नाना थोरात, सचिन शेलार आदी उपस्थित होते.आमदारपुत्राला शिक्षा होते तेव्हाया वेळी माजी आमदार रमेश थोरात म्हणाले की, २00९ साली जेव्हा मी आमदार झालो तेव्हा, माझा मुलगा गणेश एम. आय. टी. कोथरुड येथे शिक्षणासाठी होता. एके दिवशी गणेशने महाविद्यालयातुन परतताना सिग्नल तोडला. तेव्हा गणेशने मोबाइलवरून वाहतूक पोलिसांना माझ्याशी संपर्क साधून दिला. तेव्हा गणेशच्या चुकीला पाठीशी न घालता मी त्याला एक तासभर बसवून ठेवा असा सल्ला पोलिसांना दिला, असे थोरात यांनी सांगितले.