पुणे : देशातील स्मार्ट सिटींमध्ये गणल्या जात असलेल्या पुणे शहरातील तब्बल २५ ठिकाणच्या सिग्नलन्सची '' बत्ती गुल '' झाल्याने शहराच्या मध्यभागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. डेक्कन परिसराला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पुणेकरांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मनस्ताप सहन करावा लागला. मध्यवस्तीतील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता यासोबतच गणेशखिंड, सातारा रस्ता, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, या भागातील सिंग्नल बंद पडले होते. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून इंटेलिजेंट ट्रॅफिक सिस्टीम आणण्याचे स्वप्न पाहणाºया पालिकेच्या विद्यूत विभागाच्या कामाचे अपयश सोमवारच्या पावसात उघड झाले. पावसाचा जोर वाढण्याआधीच सिग्नल यंत्रणा कोलमडल्याने पुणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागला. याविषयी विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी सांगितले, की शहरात दोन दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे सिग्नल निकामी होत आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला अशा प्रकारचे बिघाड होतात. पालिकेला ३० तक्रारी प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यूत विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहतूक पोलिसांची मात्र पुरती दमछाक झाली. सकाळी दहापासून सुरु झालेली कोंडी दुपारपर्यंत कायम होती. ==== या चौकांमध्ये बंद पडली सिग्नल यंत्रणा गांजवे चौक (लालबहादुर शास्त्री रस्ता), ब्रेमन चौक (औंध), नळस्टॉप (कर्वे रस्ता), संतोष हॉल (सिंहगड रस्ता), वेगा सेंटर चौक ( स्वारगेट), सोमनाथ नगर (नगर रस्ता), जिजामाता चौक रावत ब्रदर्स चौक (सातारा रस्ता), ज्ञानेश्वर पादुका चौक, ए. बी. भावे चौक (टिळक रस्ता), स. प. महाविद्यालय चौक, जेधे चौक (स्वारगेट). ==== सिग्नल यंत्रणा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून दिवसभरात पाच सिग्नल दुरुस्त झाले आहेत. लवकरच अन्य सिग्नलही दुरुस्त होतील. पावसाळ्यात अशा समस्या निर्माण होतात. वीज जाणे, वीज वाहिन्या तुटणे, बंद पडणे अशी कारणे असतात. शहारामध्ये एकुण २४२ सिग्नल आहेत. पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठीही दोन सर्व्हिस व्हॅन सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. ===== मेट्रोचे काम सुरु असलेल्या पौड रस्ता, कर्वे रस्ता, बंडगार्डन, नगर रस्ता, पुणे स्टेशन चौक या भागांमध्ये रस्त्याच्या मध्यभागात मेट्रोचे खांब उभे करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला बॅरीकेटींग करण्यात आल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. तर काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश भागात वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. =====================
स्मार्ट सिटीत जेव्हा एकाच वेळी २५ ठिकाणी सिग्नलची होते '' बत्ती गुल''
By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 2:24 PM
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून इंटेलिजेंट ट्रॅफिक सिस्टीम आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पालिकेच्या विद्यूत विभागाच्या कामाचे अपयश सोमवारच्या पावसात उघड झाले.
ठळक मुद्देशहरात दोन दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे सिग्नल निकामीवाहतूक कोंडीमुळे वाहतूक पोलिसांची मात्र पुरती दमछाक