पुणे : दिवसभर काबाडकष्ट करून आयुष्याला आकार देणाऱ्या हातात रात्री लेखणी असते. अनंत अडचणींवर मात करत भविष्य उज्ज्वल करण्याची जिद्द घेऊन ही मुलं शिकतात. पण एकीकडे आपण अत्याधुनिक सोयीसुविधांनी स्मार्ट होत असताना या मुलांच्या अडचणी मात्र कमी होत नाहीत. गुरूवारी (दि. १०) रात्री वीज गायब झाल्याने रात्रशाळेतील या विद्यार्थ्यांना मेणबत्तीच्या उजेडात परीक्षा द्यावी लागली. तर जनरेटर किंवा इतर पयार्यांचा खर्च शाळेला परवडत नसल्याचे प्राचार्यांनी सांगितले.पूना नाईट स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे १७५ विद्यार्थ्यांनी गुरूवारी हिंदी विषयाचा पेपर दिला. परीक्षेची वेळ सायंकाळी ६ ते ९ ही होती. परीक्षा सुरू झाली तेव्हा शाळेत वीज होती. पण पावसामुळे वीज गेल्याने सर्वत्र अंधार पसरला. शाळेकडून आधीच विद्यार्थ्यांना घरून मेणबत्त्या आणण्यास सांगितले होते. तसेच शाळेतही ही पयार्यी व्यवस्था असते. मग प्रत्येक विद्यार्थ्याच्या बेंचवर मेणबत्ती लावण्यात आली. या उजेडात विद्यार्थ्यांनी दोन तास पेपर सोडविला. साडे आठ वाजण्याच्या सुमारास वीज आली, अशी माहिती प्राचार्य अविनाश ताकवले यांनी दिली. सहसा रात्रीच्या वेळी वीज जात नाही. महावितरणकडून नेहमी सहकार्य मिळते. पण गुरूवारी पावसामुळे मोठा बिघाड झाल्याने वीज गेली. शाळेमध्ये पुर्वी वीज गेल्यानंतर कंदील, गॅसबत्यांचा वापर केला जात होता. पण त्याची देखभालीचा खर्च परवडत नाही. जनरेटरचा खर्चही मोठा आहे. शाळेत सध्या आठवी ते बारावीपर्यंतचे ५०० विद्यार्थी आहेत. प्रत्येक वर्गात वीजेची पयार्यी व्यवस्था करणे शक्य नाही. त्यामुळे वीज नसल्यास मेणबत्तीचा वापर केला जातो, असे ताकवले यांनी स्पष्ट केले.
.. जेव्हा स्मार्ट सिटीतले विद्यार्थी देतात मेणबत्तीच्या उजेडात परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 7:02 PM
दिवसभर काबाडकष्ट करून आयुष्याला आकार देणाऱ्या हातात रात्री लेखणी असते...
ठळक मुद्देसुमारे १७५ विद्यार्थ्यांनी गुरूवारी हिंदी विषयाचा दिला पेपर