पुणे : कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ''गृह विलगिकरणा''त असलेले अनेक रुग्ण बिनदिक्कत बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त होऊ लागल्या आहेत. या रुग्णाच्या घरावर कोविड स्टिकर चिकटविण्यातही प्रशासनाकडून दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे, या बाधितांकडून कोरोनाचा अधिक प्रसार होण्याची दाट शक्यता असल्याने या बाहेर फिरणाऱ्या रुग्णांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. अनेकजण सोसायट्यांमध्ये बसून गप्पा मारताना, तर अनेकजण खरेदीसाठी बाहेर पडत असल्याचे चित्र दिसते आहे. अशा रूग्णांची रवानगी कोविड केअर सेंटरमध्ये करण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. परंतु, त्यावर अंमलबजावणी मात्र झालेली नाही.
शहरातील कोरोनाबधितांचा आकडा दिवसागणिक प्रचंड वेगाने वाढत चालला आहे. गृह विलगीकरणामध्ये असलेल्या रूग्णांच्या संपर्कातील व्यक्ती बाधित होण्याचे प्रमाण अधिक असल्याचा प्रशासनाचा होरा आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यातच स्वॅब चाचण्यांचे रिपोर्ट येण्यास उशीर लागत आहे. चाचण्या जरी मोठ्या प्रमाणावर होत असल्या तरी त्याचे निदान करणारी यंत्रणा अपुरी आहे. त्यामुळे रिपोर्ट येण्यास दोन ते तीन दिवस लागत आहेत. या काळात चाचणी झालेले आणि संभाव्य रुग्ण सार्वजनिक ठिकाणांवर फिरत असतात. वास्तविक त्यांना पूर्वीप्रमाणे क्वॉरंटाईन करणे आवश्यक आहे. परंतु, पूर्वीसारखी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. प्रशासनातील समन्वयाअभावी कोरोना ''एसोपी''मध्ये त्रुटी असल्याचे दिसत आहे.
------
अनेक नागरिक आवश्यकता नसताना ही रुग्णालयात दाखल झाल्याची ओरड सुरू करण्यात आली आहे. केवळ खबरदारी म्हणून भीतीपोटी काही लोकांनी खाटा अडविल्याचे निदर्शनास आल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. यामध्ये परगावाहून आलेल्या रुग्णांचाही समावेश आहे. अद्याप केंद्रीय पद्धतीने प्रवेश होत नसल्याने खऱ्या गरजू रुग्णांचे हाल होत असून ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, निमोनिया झाला आहे किंवा वैद्यकीय मदतीची गरज आहे अशा रुग्णांना खाटा मिळत नसल्याने चित्र दिसते आहे.
-------
स्वॅब चाचण्यांचे रिपोर्ट यायला दोन तीन दिवसांचा वेळ लागतो आहे. या कालावधीत संशयित रुग्ण सक्तीने गृह विलगीकरणात रहात नसल्याने अन्य नागरिकांना बाधित करण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. पूर्वीप्रमाणे विलगीकरण केंद्र सुरु करून चाचणी झालेल्याना तेथे ठेवण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे.
------
प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी
पहिल्या लाटेच्या वेळी सुरू केलेली विलगीकरण केंद्र पुन्हा सुरू करावीत. त्यामुळे गंभीर रूग्णांसाठी जागा उपलब्ध होईल. तपासणीचे रिपोर्ट येणे बाकी असलेल्या संशयित रुग्ण किंवा बाहेर फिरत असलेल्या गृह विलगीकरणामधील रूग्णांना सक्तीने क्वॉरंटाईन करण्याची आवश्यकता आहे. तशी मागणी विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
- संदीप खर्डेकर
अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन