डिंभे : म्हाळुंगे तर्फे आंबेगाव येथील रामचंद्र गणपत मसळे यांच्या घरात बिबट्याने प्रवेश करत टीव्ही ठेवण्याच्या टेबलखाली ठाण मांडल्याने घरातील सर्वांचीच गाळण उडाली. प्रसंगावधान राखत घरातील महिलांनी धाडसाने सर्वांना सुरक्षित स्थळी हलविले. वन विभागला माहिती मिळताच रेस्क्यू टीमने या बिबट्याला घरातून घेऊन माणिकडोह येथील निवारा केंद्रात सोडण्यात आले आहे. घरातून बिबट्या ताब्यात येईपर्यंत भीतीपोटी घरातील सर्वांची गाळण उडाली होती.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील माळुंगे तर्फे आंबेगाव येथील रामचंद्र गणपत मसळे यांच्या घरात रात्रीच्या वेळी अचानक प्रवेश केला. अंधाराचा फायदा घेत बिबटया घरातील टीव्हीच्या टेबलाखाली लपून बसला होता. सकाळी दूध काढण्यासाठी घरातील माणसे उठल्यावर त्यांना घरातील टीव्ही खाली बिबट्याचे शेपूट दिसले. घरातील माणसांना वाटले हा साप असावा. म्हणून त्यांनी काठीने शेपटी हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र टीव्ही खाली साप ऐवजी बिबट्या दिसल्याने घरातील सर्वांचीच सकाळी सकाळीच तारांबळ उडाली. घरात रामचंद्र मसळे यांची पत्नी सुगंधा, आई जिजाबाई यांनी प्रंसगावधान दाखवत कसाबसा आपला जिव वाचला असे या कुटुंबातील रामचंद्र मसळे यांनी सांगितले.
सदरची घटना ही वन विभागाला कळविण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या घरात अडचणीच्या जागेत जाऊन बसला होता. बिबट्या आजारी असून घाबरल्यामुळे तो लवकर घरातून बाहेर निघत नव्हता. त्याला पकडण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेत बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आला आहे. जवळपास पाच ते सहा वर्षांचा हा पूर्ण वाढ झालेला बिबट्या आहे. बिबट्या जखमी व आजारी असल्यामुळे त्याला घरातून काढणे अवघड झाले होते. पंरतु रेसक्यु टिममुळे व स्थानिकांच्या सहकार्याने त्याला पकडुन जेरबंद करण्यात आले आहे. बिबट्या आजारी असल्याने त्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्रात उपचार सोडण्यात आली आहे.