पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार अशी विभागणी झाली आहे. पवार कुटुंबातील खा. सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे शरद पवारांसमवेत आहेत. तर, राष्ट्रवादीतील बहुतांश आमदार अजित पवारांसोबत आहेत. राष्ट्रवादीतील या अंतर्गत वादात आमदार रोहित पवार आक्रमक झाले असून खिंड लढवताना दिसून येतात. राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांवर ते जोरदार प्रहार करत आहेत. त्यातच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हेही आता राजकारणात एंट्री करतात का, अशी चर्चा बारामतीच्या राजकारणात रंगली आहे.
जय पवार यांनी बारामतीमधीलराष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी, येथील राष्ट्रवादीच्या युवक नेत्यांनी त्यांच्यासोबत संवाद साधला. मी नवीन कार्यालयात पहिल्यांदाच भेटीसाठी आलो, बाहेर असल्यामुळे येता आलं नाही. ही सगळी नवीन टीम म्हणजे आता आपली टीम वाटतेय, सगळे स्वत: पुढे येऊन काम करतात. आधी काय व्हायचं, सगळे बोलायचे, थोडे प्रॉब्लेम आहेत. पण, यावेळेस तसं काहीच नव्हतं. मी सर्वांचे आभार मानायला कार्यालयात आलो, असे जय पवार यांनी म्हटलं.
दरम्यान, या कार्यालय भेटीत कार्यकर्त्यांनी जय पवार यांना पक्ष सातत्याने कार्यालयात येण्याचा आग्रह केला. अजित पवारांना महाराष्ट्र सांभाळायचा आहे, त्यांना मुख्यमंत्री करायचं आहे. त्यामुळे, आम्हाला तुम्ही पाहिजे आहात, तुम्ही वेळ देत चला, सर्व युवकांची इच्छा आहे, तुम्ही पाहिजे, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. त्यावर, तुम्हाला मी पाहिजे आहे तर दादांना बोला. तुम्ही एकदा दादांशी बोलून बघा, दादांकडून ग्रीन सिग्नल आला की मी आहेच, असे म्हणत जय शहा यांनीही राजकीय मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली आहे.
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आता अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हेही राजकारणात सक्रीय होतील, अशी चर्चा यानिमित्ताने बारामतीमध्ये होत आहे. यापूर्वी पार्थ पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर, पार्थ पवार राजकारणात जास्त सक्रीय दिसले नाहीत. मात्र, रोहित पवार हे आमदार झाल्यानंतर सातत्याने राजकारणात सक्रीय राहिले आहेत. त्यामुळे, निश्चितच त्यांचा फॅन फॉलोविंग वाढला असून ते राजकीय वर्तुळात कायम वावरतानाही पाहायला मिळत आहे.