कात्रज : आमचं घड्याळ चोरीला गेलं आहे, त्यामुळे तुतारीला मतदान करा आणि आमचे सरकार आणा त्यानंतरच पुण्याचे ट्रॅफिक, खड्डे, पाणी यासारख्या समस्या सुटतील आणि शहराची कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कात्रज येथे सभा पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, शहराध्यक्ष म्हणून प्रशांत जगताप यांनी जबाबदरी उत्तम पार पाडली आहे. प्रशांत जगताप असे कार्यकर्ते आहेत जे एकनिष्ठ राहिले. त्यांनी ठामपणे निर्णय घेत साहेबांसोबत राहिले. लोकसभेला चांगले काम केले. अशा कार्यकर्त्यांमुळे लोकसभेला चांगले यश आम्ही मिळवले. आता विधानसभेत एकनाथ शिंदेंचं सरकार पराभूत करून आमचं सरकार आणा, एवढं ट्रॅफिक आहे की पुणे शहरातील प्रोजेक्ट बाहेर चालले आहेत. शहरात किती अपघात दरवर्षी होतात. पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था कुठे आहे. पुण्याची ड्रग्सचं वेगळं शहर म्हणून आता ओळख होतेय, तसेच कोयता गँगची पुण्यात दहशत आहे. यांना साधा कोयता गँगचा बंदोबस्त नाही करता येत, हे राज्यात काय कायदा सुव्यवस्था काय राखणार.
प्रशांत जगताप म्हणाले, हडपसरचं भवितव्य आपल्याला ठरवायचे आहे. मागील आमदारांनी काय दिलं याचं पोस्टमार्टम करायची वेळ आता आली आहे. यांनी कात्रजचा काय विकास केला, हडपसरचा काय विकास केला. मागील आमदार कोविडमध्ये कोठे होते, घरात की वाॅर्डात याचा जाब तुम्ही विचारा, मागच्या आमदारांनी काय केले, याचा सवाल तुम्ही विचारा. आमदारांनी या ठिकाणी हॉस्पिटल, गार्डन यापैकी काही आणलं असतं तर तो विकास होता; पण त्यांनी विकास केला नाही. यावेळी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वसंत चौगुले व इतरांनी पक्षात प्रवेश केला.