पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारी २६ सप्टेंबरला होणारा पुणे दौरा रद्द करण्यात आला. राज्यात सुरु झालेल्या परतीच्या पावसाने हा दौरा रद्द करण्यात आल्याचे पतंप्रधानांच्या कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले. त्यानंतर महाविकास आघाडीकडून मेट्रोचे उदघाटन करण्याचा इशारा देण्यात आला. महाविकास आघाडीने आज पुण्यात आंदोलन केलं, मात्र या आंदोलनावरून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
मोहोळ म्हणाले, कुठं राजकारण करावं आणि करू नये हे समजायला हवे. मेट्रो हा पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. हि मंडळी ५० वर्षे सत्तेत होती. तेव्हा मेट्रो कुठेही झाली नाही. त्यांना काय अधिकार आहे अशा गोष्टीच राजकारण करायचा. यांच्या काळात अयशस्वी बीआरटी झाली. अपघाताचे बळी २ ठरलेले पूल पाडावे लागले. पुण्याच्या भविष्याचा विचार न करता नुकसान यांनी केलं आहे. ज्यांना पुण्यासाठी काही करता नाही आलं ते आता मेट्रोचे उदघाटन करायला निघाले आहेत. पुणेकर हे पाहत आहेत. एका दिवसाचं अंतर आहे. गेल्या १० वर्षात काम झालं. स्वप्नातली मेट्रो पुण्यात आली.
विरोध करणारी मंडळी आता उदघाटन करायला निघाली
टप्प्याटप्प्याने मेट्रो मार्ग होतात. तर त्यांनी हा प्रकल्प पुण्याला दिला. विरोधकांचं पोट दुखतंय. त्यांना मळमळ होतंय हा प्रकल्प असा पूर्ण झाला तर निवडणुकीला आमचं काय होईल. लोकसभेला पुणेकरांनी दाखवून दिलंय. तुम्ही कितीही राजकारण केलं. कितीची आव आणण्याचा प्रयत्न केला कि पुणेकरांची आम्हाला चिंता आहे. तरी पुणेकर अशा राजकारणाला थारा देणार नाहीत. मध्यंतरी पुण्यात पूर आला तेव्हा यांच्या तळपायाला सुद्धा पाणी लागलं नाही. यांच्या काळात नुसती भूमिपूजन व्हायची. मोदी अशा वेळी पंतप्रधान झाले कि त्यांच्याच काळात भूमिपूजन आणि उदघाटन होत आहेत. पुण्याची मेट्रो करण्याला विरोध करणारी मंडळी आता उदघाटन करायला निघाले असल्याची टीका मोहोळ यांनी केली आहे.
सगळ्या बाजूने मेट्रोचा विस्तार करणार
२९ सप्टेंबरला सकाळच्या वेळेत १२ च्या आसपास मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या मार्गाचे उदघाटन होणार आहे. तर स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे भूमिपूजन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत. गणेश कला क्रीडा मंच येथे ऑनलाईन पद्धतीने मोदी पुणेकरांशी संवाद साधणार आहेत. गेल्या १० वर्षांच्या काळात ३२ किलोमीटर मेट्रोच्या मार्गाचा काम पूर्ण झालं. पुढच्या काळात वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली याला कॅबिनेटची मान्यता मिळेल. पुण्याच्या सगळ्या बाजूने मेट्रोचा विस्तार करण्याचा आमचा मानस असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.