शिरूर : शिरूर तालुक्यातील आगामी घोडगंगा सहकारी साखर कारखाना, जिल्हा परिषद, बाजार समिती, शिरुर नगरपरिषद निवडणुका राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जो आदेश देतील त्या प्रमाणे लढवल्या जातील परंतु वेळ पडली तर स्वबळावर शिवसेना पक्ष लढवण्याची तयारी ठेवणार असल्याचे प्रतिपादन शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले आहे.
शिरूर तालुक्यातील आण्णापुर, सरदवाडी, रामलिंग व सरदवाडी या भागात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गावभेट दौऱ्याचे आज आयोजन केले होते. त्यानंतर येथील विश्राम गृहात पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.
आढळराव पाटील म्हणाले की, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार खासदार नसताना या भागातील या शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच आज शिरूर, अण्णापूर, रामलिंग या भागाचा दौरा करून तेथील ग्रामपंचायतीचे प्रश्न त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी चे प्रयत्न राज्यातील सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
पुणे-नगर-औरंगाबाद नॅशनल हायवे हा रस्ता सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी नवीन एजन्सीच्या माध्यमातून डी पी आर काढण्याचे काम सुरू आहे. काही कालावधी लागणार आहे. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी अधिकारी यांच्याशी माझ्या बैठका, चर्चा चालू आहे. पूणे- नाशिक सेमी हायस्पीड पहिला उपक्रम असणार असल्याचेही सांगून भूसंपादनाचे काम सुरू आहे . लवकरच हा प्रकल्प पूर्णत्वास येईल अशी आशा ही माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी व्यक्त केली असून शिवसेना पक्षातून मी काँग्रेस राष्ट्रवादी आणि आता भाजपात जाणार असल्याच्या चर्चा आहे. परंतु शिवसेना पक्षाने मला सर्व काही दिले असताना मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. माझे नाव घेऊन प्रेम करणारे विरोधक चर्चा करत आहेत परंतु या चर्चा या कायम च्या चर्चाच राहिल्या आहेत.
शिरूर लोकसभा शिरूर तालुका प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाची बांधणी सुरू असून पक्षातील किरकोळ वाद मिटवून सर्व शिवसैनिक एकजूट करणार आहे. शिरूर तालुक्यात असणारी गटबाजी काही दिवसात संपलेली दिसणार असून आज सर्वजण माझ्याबरोबर दौऱ्यामध्ये आहेत. लवकर च शिरूर तालुक्यात रांजणगाव गणपती या भागात व्हेंटिलेटर ऑक्सिजन असणारे कोविड सेंटर सुरू करणार आहे, तेही सर्वांना मोफत असणार असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.