पुणे : पुण्यात सध्या वाहतूकीचे नियम माेडणाऱ्यांवर वाहतूक पाेलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. सकाळपासूनच पुण्यातील चाैकाचाैकात पाेलीस वाहनांची तपासणी करत आहेत. त्याचबराेबर सीसीटिव्हीच्या माध्यामातून देखील नियम माेडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येेते. याचाच प्रत्यय आज राेहित पवार यांना आला. राेहित पवार यांची गाडी सिग्नलला उभी असता चाैकात उभ्या असणाऱ्या वाहतूक पाेलिसांनी त्यांच्याकडील मशीनमध्ये पवार यांच्या गाडीचा नंबर टाकला. गाडीवर दंड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी राेहित पवार यांच्या चालकाला दंड भरण्यास सांगितले. राेहित पवार यांनी प्रामाणिकपणे दंड भरुन वाहतूक पाेलिसांशी संवाद साधला तसेच त्यांच्या व्यथा जाणून घेत ते करत असलेल्या कामाचे काैतुक केले.
राेहित पवार यांनी फेसबुकवर पाेस्ट लिहीत याबद्दल माहिती दिली आहे. राेहित पवार यांची गाडी आज सकाळी पुण्यात एका सिग्नलला थांबली हाेती. यावेळी त्या चाैकात उभ्या असणाऱ्या वाहतूक पाेलिसांनी त्यांच्या गाडीच्या क्रमांकाची सिस्टिममध्ये तपासणी केली. त्यावेळी गाडीवर झेब्रा क्राॅसिंगवर उभी असल्याचा दंड असल्याचे लक्षात आले. वाहतूक पाेलिसांनी तात्काळ दंडाची वसूली केली. राेहित पवार यांनी देखील दंड भरुन वाहतूक पाेलिसांशी संवाद साधला. अनेकदा मित्र फाेन करुन पाेलिसांना दंड माफ करण्यास सांगावे असे सांगतात, परंतु मी नेहमी त्यांना दंड भरण्यास सांगून नियम पाळण्याचे आवाहन करत असल्याचे पवार यांनी त्यांच्या पाेस्ट मध्ये म्हंटले आहे. तसेच पाेलीस हे उन्हातान्हात उभे राहून आपले कर्तव्य बजावत असतात अशावेळी आपण नियम पाळून भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे असे आवाहन देखील पवार यांनी आपल्या पाेस्टच्या माध्यमातून केले आहे.
दरम्यान या आधी राेहित पवार यांनी साेशल मीडियावर पाेस्ट लिहीत त्यांचे आजाेबा शरद पवार यांनी लाेकसभा निवडणुक लढवावी यासाठी भावनिक साद घातली हाेती. त्यांची ती पाेस्ट साेशल मीडियावर चांगलीच गाजली हाेती.