युगंधर ताजणे
पुणे : रानमळ्याची गोष्ट तशी काही साधी-सोपी नाही. कोणेएके काळी या गावात प्यायला पाणी नव्हते, असे सांगितले तर कुणाचा विश्वास बसणार नाही. गावातील एकाच विहिरीवर प्यायचे पाणी, घरातील कामासाठी पाणी, इतकेच नव्हे तर जनावरांना प्यायलादेखील याच विहिरीवर अवलंबून राहावे लागे. मात्र, ग्रामस्थांनी मनात आणले आणि रानमळा गर्द झाडीने नटून गेला. शासनाने या सामाजिक वृक्षलागवडीची दखल घेऊन राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ योजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत. रानमळा. पुणे जिल्ह्यातील, खेड तालुक्यातील छोटं गाव. जवळपास १, ८०० लोकांचा उंबरा असलेल्या गावात लोकसहभागातून जन्म, विवाह आणि देवाज्ञा अशा अविस्मरणीय प्रसंगांच्या निमित्ताने वृक्षलागवडीचा कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हाती घेतला जातो. यात त्या प्रसंगी प्रत्येक कुटुंबातील घराच्या आजूबाजूला, मोकळ्या जागेत, परसबागेत तसेच शेताच्या बांधावर फळझाडांची रोपे लावून आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण दीर्घ काळासाठी जपली जाते. अशा कल्पक आणि अभिनव उपक्रमातून रानमळा हे गाव पर्यावरणसमृद्ध झाले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गावातील अनेक कुटुंबांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन निर्माण झाले असून, हे सारे पाहण्यासाठी आता देश नव्हे तर परदेशी नागरिकदेखील रानमळ्याला भेट देऊ लागले आहेत. ज्यांच्या सहकार्य आणि कल्पनेतून रानमळ्याचा कायापालट झाला ते पी. टी. शिंदे गुरुजी यांच्याशी दैनिक ‘लोकमत’ने संवाद साधला असता त्यांनी रानमळ्याच्या प्रेरणादायी संघर्षाबद्दल सांगितले. १९९५ पूर्वी या गावात पाण्याचे दुर्भिक्ष होते. दुष्काळ पसरला. हे सगळे विदारक चित्र बघून शिक्षकपदाची नोकरी सोडून गावाच्या विकासाला वाहून घेतले. पुढे बिनविरोध सरपंचपदी निवडून आल्यानंतर गावाच्या विकासाबाबत अभ्यासपूर्वक दिशा ठरवली. सांडपाण्याची विल्हेवाट, वृक्षारोपण, त्याचे महत्त्व याविषयी ग्रामस्थांचे प्रबोधन केले. १९९७ मध्ये झाडे लावण्याचा खास उपक्रम हाती घेतला. त्यात महिलांचा सक्रिय सहभाग होता. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुणाला दहावीत चांगले गुण पडले, कुणाला मुलगा- मुलगी झाली, लग्न, वाढदिवस इतकेच नव्हे, तर कुणी नवीन गाडी घेतली एवढे निमित्त झाड लावायला पुरेसे होते. ग्रामस्थांनी याला साथ देत अखंडपणे वृक्षारोपणाचे व्रत जपले आहे. दर वर्षी ५ जूनला रोपांचे वाटप केले जाते. ८ दिवस अगोदर लोकांना टोकन दिले जाते. त्यात ग्रामस्थ निमित्त कळवतात. यानंतर रोपांची पालखीतून वाजतगाजत पूजा केली जाते. या प्रकारे आध्यात्मिक आणि भावनात्मक बंध देऊन वृक्षारोपणाचा मूलमंत्र जपला जातो. राज्यातील वनक्षेत्र २० टक्क्यांवरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी ‘हरित महाराष्ट्र’ उपक्रम शासनाच्या वतीने राज्यात राबविण्यात येत आहे. राज्याला हिरवेगार आणि सुरक्षित पर्यावरणाच्या दिशेने नेण्यासाठी रानमळा ग्रामपंचायतीच्या धर्तीवर इतर सर्व ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
* रानमळ्यातील अनोखे ‘वृक्षारोपण’ उपक्रम १. शुभेच्छा वृक्ष - यात वर्षभरात गावात जन्माला येणाºया बालकांच्या जन्माचे स्वागत संबंधित कुटुंबाला फळझाडांची रोपे देऊन करण्यात येते. २. शुभमंगल वृक्ष - दर वर्षी गावातील ज्या तरुणांचे विवाह होतात, त्यांना फळझाडांची रोपे देऊन आशीर्वाद देण्यात येतात. ३. आनंदवृक्ष- गावात जे विद्यार्थी दहावी व बारावीची परीक्षा उत्तीर्ण होतात, तसेच गावातील ज्या तरुण-तरुणींना नोकºया मिळतात इतकेच नव्हे, तर जे उमेदवार विविध निवडणुकांमध्ये विजयी होतात त्यांना फळझाडांची रोपे देण्यात येतात.४. माहेरची साडी- गावातील मुलगी लग्न होऊन सासरी जाते. अशा वेळी तिला सासरी जाऊन रोप देणे अवघड असते. म्हणून त्या विवाहित मुलींच्या माहेरच्या लोकांना फळझाडांची रोपे देण्यात येतात. आपल्या मुलीप्रमाणेच त्यांनी या रोपाची काळजी घ्यावी, हा भाव त्यामागे आहे. ५. स्मृतिवृक्ष - गावातील ज्या व्यक्तीचे वर्षभरात निधन होते त्या कुटुंबाला फळझाडांचे रोप देऊन श्रद्धांजली वाहण्यात येते. ते कुटुंब वृक्षाच्या निमित्ताने आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतींचे जतन करते. शासनाच्या निर्णयातदेखील या योजना ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणार आहेत.
* सुरुवातीला रानमळ्यातील ग्रामस्थांच्या मनात उदासीनता होती. प्रबोधनानंतर मात्र त्यांची विचार करण्याची दिशा बदलली. त्यांनी वृक्षारोपणावर भर द्यावा, याकरिता त्याला आध्यात्मिक, भावनिक गोष्टींचा आधार दिला. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेत परिवर्तन होऊन वृक्षारोपणाविषयी आदरभाव तयार झाला. - पी. टी. शिंदे (माजी सरपंच आणि प्राथमिक शिक्षक)
* आंब्याच्या झाडाची गोड आठवण माझ्या मुलीने आंब्याची १० झाडे लावली. आता तिचे लग्न झाले आहे. मात्र, ती जेव्हा पहिल्यांदा माहेरी आली, त्या वेळी मी त्या प्रसंगाची आठवण म्हणून आणखी एक आंब्याचे झाड लावले. विविध आठवणींचा बंध वृक्षारोपणाशी घालून त्याप्रति आदरभाव जपता आला, याचे मनापासून समाधान वाटते. पर्यावरण सुरक्षितता ही काळाची गरज त्याबद्दल सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. - गणेश भुजबळ (शेतकरी)