लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेतून राज्यात २४ जिल्ह्यांमधील ५० लाख शेतकऱ्यांना २२०६ कोटी रुपयांची अग्रिम नुकसानभरपाई जाहीर झाली. ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे आदेश विमा कंपन्यांना दिले होते. मात्र, दिवाळीनंतर महिना लोटला तरी अद्याप १३ लाख ८६ हजार ९८३ शेतकरी ५०० कोटींच्या अग्रिमपासून वंचित आहेत. यावरून विमा कंपन्यांनी सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट होत आहे. योजनेतील तरतुदीनुसार पावसाचा २१ दिवसांपेक्षा जास्त खंड व उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्यास नुकसानभरपाई मिळते.
कंपन्यांकडून १८ डिसेंबरपर्यंत ३७ लाख ७ हजार ४८४ शेतकऱ्यांना १ हजार ७०७ कोटींचे अग्रिम वितरित केले आहे. अद्याप ४९८ कोटी ९९ लाखांचे अग्रिम वितरित झालेले नाही.
एक हजारपेक्षा कमी अग्रिम राज्यात ९५ हजार ६२७ शेतकऱ्यांना एक हजार रुपयांपेक्षा कमी अग्रिम रक्कम मिळाली आहे. ही रक्कम ६ कोटी ५२ लाख ५३ हजार आहे.
आधार संलग्न नसल्याने अडकले ६८ कोटीदरम्यान, आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नसल्याने १ लाख ६१ हजार ३० शेतकऱ्यांना ६८ कोटी ७१ लाख ६३ हजार अग्रिम वाटण्यात अडचणी आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने आधार क्रमांक बँक खात्याला जोडावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.