पुणे : शहरातील अनधिकृत पब, हॉटेल, रूफटॉप हॉटेल यांच्यावर पुणे महापालिका कारवाई करते, मात्र त्या जागी पुन्हा व्यवसाय सुरू केला जातो. त्यामुळे पुणे महापालिकेने ८९ अनधिकृत रूफटॉप हॉटेलची यादी देऊन त्यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी पोलिसांकडे केली होती. मात्र, गेल्या पाच महिन्यांत काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे अनधिकृत पब, रूफटॉप हॉटेलवर कारवाई कधी करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहराच्या विविध भागात इमारतींच्या टेरेसवर, तसेच सामाईक जागेत शेड उभे करून हॉटेल व्यवसाय केला जात आहे. यामुळे या भागातील रस्त्यांवर पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो, तसेच रात्री उशिरापर्यंत हे हॉटेल सुरू राहतात, त्यामुळे या भागातील नागरिकांना त्याचा उपद्रव होतो. पार्किंग, ध्वनिप्रदूषण यासंदर्भात नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येतात. याची दखल घेत महापालिकेने रूफटॉफ हॉटेलवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. शहरातील ८९ अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सपैकी ७६ हॉटेल्सला नोटिसा पाठविण्यात आल्या. त्यापैकी ५३ हॉटेल्सवर कारवाई केली गेली. सहा हॉटेल मालकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम काढून घेतले आहे. सात हॉटेल्सचा वापर बंद झाला आहे. सात हॉटेल्स मालकांनी कारवाईला स्थगिती मिळविली आहे. तसेच नऊ हॉटेल्सवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमच्या कलम ५२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या हॉटेल्सवर गुन्हा नोंदवूनही त्याचा पुन्हा वापर केला जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र महापालिकेने पुणे पोलिसांना पाच महिन्यांपूर्वी लिहिले होते. त्यावर अद्याप कारवाई झाली नाही. त्यामुळे पोलिस कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कल्याणीनगर येथील बॉलर पबचीही अधिकाऱ्यांकडून पाहणी
कल्याणीनगर येथील बॉलर पबसमोर बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने भरधाव कार चालवून धडक दिली. यात तरुणीसह दोघांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली आहे. महापालिकेनेही या अपघाताच्या निमित्ताने पब, हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील बेकायदा बांधकामांच्या दृष्टीने तपासणी करण्याचे आदेश दिले असून, बॉलर पबच्या पाहणीसाठी देखील पथक पाठविले होते.
पालिकेकडे पबची नोंद नाही
शहरात शेकडोंच्या संख्येने रूफटॉप हॉटेल्स सुरू आहेत. बांधकाम विभागाच्या रेकॉर्डवर केवळ ८९ हॉटेल्स दाखविण्यात आली आली आहेत. महापालिकेकडे पबची नोंदच नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईचा अहवाल स्थायी समोर ठेवणार
शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येते. त्यासाठी प्रथम नोटीस बजावून प्रत्यक्ष कारवाई केली जाते. त्यानुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाईसंदर्भात बांधकाम विभागाच्या वतीने प्रत्येक महिन्याला काय कारवाई केली, याचा अहवाल स्थायी समितीसमोर ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.