पुणे : अशोक सिंग या ७० वर्षीय व्यक्तीने २ मार्च रोजी कोविन संकेतस्थळावर लसीकरणासाठी नोंदणी केली. महापालिकेच्या रुग्णालयातील ३ मार्च रोजी दुपारची वेळ मिळाली. त्यानुसार, कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेण्यात आला. आता संकेतस्थळावर पहिल्या डोसचे प्रमाणपत्र मिळाले असून, दुसऱ्या डोससाठी त्याच रुग्णालयात ३१ मार्च रोजीची वेळ मिळाली आहे. मात्र, नवीन नियमानुसार संबंधित रुग्णालयात सध्या केवळ कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. तसेच, आता कोविशिल्ड एक महिन्याऐवजी दोन महिन्यांनी घ्यावी, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता दुसरा डोस घ्यायला नेमके कधी आणि कोठे जायचे, याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.
हे झाले प्रातिनिधिक उदाहरण. मात्र, सध्या सर्वत्र हाच संभ्रम पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त व्यक्तींच्या लसीकरणाला १ मार्चपासून सुरुवात झाली. सुरुवातीला सर्व्हर डाऊन होत असल्याने नोंदणी केलेली असूनही ताटकळत थांबावे लागणे, गर्दी होणे असे प्रकार अनुभवायला मिळाले. त्यानंतर कोविशिल्ड की कोव्हॅक्सिन, हा गोंधळ सुरू झाला. अचानक कोविशिल्डची केंद्रे कमी केली तर कोव्हॅक्सिनची केंद्रे वाढवली. आता दुसऱ्या डोसचा कालावधीच वाढवला आहे. लसीकरण मोहिमेतील नियोजनाचा अभाव यानिमित्ताने प्रकर्षाने समोर येत आहे. तिसऱ्या टप्प्यातच असा गोंधळ असताना सरसकट लसीकरणाला सुरुवात झाल्यावर नियोजन कसे केले जाणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
-----
अडचणींचा डोंगर
* देशात दररोज साधारणपणे २० लाख लोकांचे लसीकरण सुरू आहे. ही संख्या ७० लाखांपर्यंत गेल्यासच लसीकरणाचा वेग वाढू शकेल. मात्र, तांत्रिक अडचणी, सतत बदलणारी धोरणे याचा परिणाम लसीकरणावर होत आहे.
* ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे, या मुद्द्याकडे वैद्यकतज्ज्ञांनी सुरुवातीपासून लक्ष वेधले. आता राज्य सरकारनेही याबाबत केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणे आणि नियमांमध्ये शिथिलता आणणे गरजेचे आहे. याबाबत केवळ चर्चा होण्यापेक्षा वेगाने निर्णय घेऊन अमलात आणणे अपेक्षित आहे.
* लसीकरणाची सुरुवात कोविशिल्ड लसीने झाली. ९८ टक्के ज्येष्ठ नागरिकांना कोविशिल्डचा डोस दिला. अचानक कोव्हॅक्सिनची केंद्रे वाढवली आणि कोविशिल्डची केंद्रे कमी केली.
* कोविशिल्डच्या मानवी चाचण्या पार पडल्यावर पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनी घ्यावा, असे जाहीर केले. आता अचानक हा कालावधी चार ते सहा आठवड्यांनी वाढवला आहे.