लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश पक्रिया रखडली असून राज्यातील सर्वाधिक अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रवेश दरवर्षी पुणे विभागात होतात. नोव्हेंबर अखेरीस राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सीईटी निकाल जाहीर होणार असल्याने जानेवारीपासून अभियांत्रिकी महाविद्यालये आॅनलाईन किंवा आॅफलाईन पध्दतीने सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पहिली सीईटी परीक्षा १ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत घेतली. तसेच अतिवृष्टीसह अनेक कारणांमुळे विद्यार्थी राहले. त्यामुळे ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा सीईटी घेतली. येत्या २८ नोव्हेंबर रोजी सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता असून प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी लागणार आहे.
पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर ,कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रवेश होतात. परंतु, कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती बिघडली असून रोजगाराच्या संधींमध्ये सुध्दा बदल झाला आहे. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमास किती विद्यार्थी प्रवेश घेतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
--
कोरोनामुळे सर्वच परिस्थितीत पदल झाला आहे. त्यामुळे यंदा प्रवेश वाढतील की कमी होतील, याबाबत सध्यस्थितीत अंदाज व्यक्त करता येणार नाही. परंतु, दरवर्षी प्रमाणे विद्यार्थ्यांकडून प्रवेशास चांगला प्रतिसाद मिळेल,अशी अपेक्षा आहे.
- डॉ. दिलीप नंदनवार, सहसंचालक ,तंत्र शिक्षण भाग, पुणे
---
पुणे विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालय संख्या : १२५
विभागातील अभियांत्रिकी प्रवेश क्षमता : ४९,२८८