पुणे : आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी महाराष्ट्र - कर्नाटकमधून आळंदीत येतात आणि इंद्रायणीनदीत अंघोळ करतात. पण आता या नदीचे पाणीही प्रदूषित झाले आहे. परंतु, प्रदूषण करणाऱ्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी काहीच करत नाहीत. ते निद्रीस्त अवस्थेमध्ये असल्याचे पहायला मिळत आहे. त्यांना जागे करण्यासाठी नदीप्रेमींनी थेट मंडळाच्या कार्यालयात जाऊन पालखी आंदोलन केले.
गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणीत प्रदूषण वाढत आहे. या विरोधात शिवसेना, (ठाकरे गट) पुणे शहराच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. पण त्याविषयी काहीही पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात समोर पालखी आंदोलन केले आणि अधिकाऱ्यांना नदीतील प्रदूषित पाणी भेट म्हणून दिले. वारीसाठी हजारो वारकरी आळंदीत येऊन इंद्रायणीत अंघोळ करतात. त्या वारकरी तसेच माऊली भक्तांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ शिवाजी नगर, पुणे कार्यालयावर इंद्रायणीचे प्रदूषित पाणी आणून त्याची प्रतिकात्मक पालखी काढून आंदोलन केले. मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना तीर्थ म्हणून इंद्रायणीचे प्रदूषित पाणी दिले. या वेळी शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे, अनंत घरत उपस्थित होते.
संजय मोरे यांनी सांगितले की, यापुढे शिवसेना प्रशासनाला प्रदूषित पाण्याने आंघोळ घालायला ही मागेपुढे पाहणार नाही, त्यामुळे तत्परतेने प्रदूषण मंडळाने प्रदूषणाकडे लक्ष द्यावे. यावेळी आंदोलनात उपशहरप्रमुख प्रशांत राणे, समीर तुपे, आनंद गोयल, भरत कुंभारकर, अनंत घरत, कल्पना थोरवे, स्वाती ढमाले, राजेंद्र बाबर, अतुल दिघे, राजेश मोरे, मुकुंद चव्हाण, जगदीश दिघे आदी सहभागी झाले होते.