रस्त्यावर लावलेल्या दुचाकी, चारचाकी व माल वाहतुकीच्या गाड्या, फळांच्या गाड्या, दुकानांचे फलक, रस्त्यावर बसलेले भाजीपाला, खेळणी, चप्पल व इतर विक्रते यामुळे खोळंबलेल्या वाहतुकीतून धुराचा वास घेत जीव मुठीत धरून जावे लागते. पोलीस व भोर नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे भोरवासीयांचा श्वास नेहमीच गुदमरतो. तो वाहतुकीच्या व प्रदूषणाच्या कोंडीतून सुटणार कधी? असा प्रश्न भोर तालुक्यातील नागरिकांना पडला आहे. भोर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या नगरपालिका चौक ते एसटी स्टँडपर्यंतच्या रस्त्यावर विविध प्रकारची दुकाने, बँका व कार्यालये आहेत. मात्र कोणत्याच इमारतीला पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्यांच्या गाड्या, दुकानांचा माल घेऊन आलेले ट्रक व बँकांत, कार्यालयांत येणारे याशिवाय दुकानदारांच्या गाड्या व दुकानांचे फलक यामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होते. राजवाडा चौक, पंचायत समिती, नवी आळी, सम्राट चौक चौपाटी या परिसरातही वारंवार वाहतुकीची कोंडी होते. याचाही त्रास नागरिक व वाहनचालकांना सहन करावा लागतो, तर मंगळवारी बाजार असल्याने मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे विक्रेते व ग्राहक येत असल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर सतत वाहतुकीची कोंडी झालेली असते.नगरपालिकेकडून तीन वर्षांपूर्वी सम-विषम तारखेला पार्किंग करून वाहतुकीवर उपाय काढण्यात आला होता. फलकही लावण्यात आले होते. मात्र अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे ते बारगळले. नवीन अधिकारी आल्यावर चार-पाच महिन्यांपूर्वी पोलीस अधिकारी नगरपालिका यांची संयुक्त बैठक घेऊन वाहतुकीवर उपाययोजना करण्यात आली होती. त्या वेळी शहरातील बाजारपेठेतील बाहेर आलेली अतिक्रमणे काढण्याचा निर्णय झाला. काही नियमही ठरविण्यात आले. मात्र पोलीस व नगरपालिका प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे पुढे काहीच झाले नाही. ठरलेल्या नियमांना हरताळ फासण्याचे काम त्यांनी केल्याने वाहतुकीची समस्या ‘जैसे थे’ राहिली आहे. भोर पोलीस ठाण्याकडून दोन पोलिसांची शहरात होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. मात्र हे पोलीस शहरातील वाहतुकीची कोंडी सुधारण्याऐवजी एसटी स्टँडवरील अवैध वाहतूक कशी सुरळीत चालेल, याकडे अधिक लक्ष देत आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या सुटण्याऐवजी अधिकच वाढत गेली आहे. याला पोलीस आणि नगरपालिकाच जबाबदार असल्याचे नागरिक सांगतात.
भोरमधील वाहतूकसमस्या सुटणार कधी?
By admin | Published: January 11, 2016 1:36 AM