शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर 'हा' नेता राष्ट्रवादीत कधी प्रवेश करणार? अजित पवार म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 02:22 PM2021-01-09T14:22:38+5:302021-01-09T14:25:54+5:30
सोलापूर येथील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेश कोठे शिवबंधन सोडून हातात घड्याळ बांधणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
पुणे : सोलापूर येथील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेश कोठे शिवबंधन सोडून हातात घड्याळ बांधणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याचवेळी शिवसेनेतून कोठे यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. मात्र यावर राजकीय वर्तुळात याविषयी उलट सुलट प्रतिक्रिया उमटत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मोठे भाष्य केले आहे.
विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांनी शिवसेना उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली होती. त्यावेळीही कोठे यांची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर कोठे पुन्हा सेनेत सक्रिय झाले होते. यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा त्यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले.
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटमध्ये आयोजित सभेला अजित पवार हे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, महेश कोठे आहे मागील सात-आठ महिन्यांपासून अस्वस्थ होते. वेगळी भूमिका घेण्याची त्यांची इच्छा होती. परंतु महाविकास आघाडीमध्ये एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत असं ठरलेलं आहे. तसेच महेश कोठे हे मला भेटलेले नाहीत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच मी याबाबत काही सांगू शकेन.
कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी
महेश कोठे यांनी गुरुवारी शिवसेना सोडल्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी ते आणि त्यांचे समर्थक गुरुवारी रात्रीच मुंबईत पोहचले आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महेश कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेश होईल, असे कोठे समर्थकांकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रवेशाचा कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला आहे. या राजकारणाचे पडसाद उमटले आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले.