पुणे : राज्य परिवहन महामंडळाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पूर्ण क्षमतेने प्रवासीसेवा सुरू केली. यात लाल परी, शिवशाही, शिवनेरी आदी गाड्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातही आता लालपरीला चांगला प्रतिसाद लाभतो आहे. असे असले तरीही पुणे विभागातील अनेक छोट्या गावांमध्ये मुक्कामी एसटी येत नाही. त्यामुळे खेड्यापाड्यातील प्रवासी आता मुक्कामी येणाऱ्या एसटीची वाट पाहत आहे.
एसटीला महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजली जाते. आजही ग्रामीण भागात एसटीसारखे वाहतुकीचे प्रभावी माध्यम नाही. मात्र अजूनही जवळपास १०० ते १५० गाड्या मुक्कामी येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी अन्य वाहतुकीच्या साधनांचा वापर करीत आहे. एसटी नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यांना सकाळी बाहेरगावी जाणे त्रासदायक ठरत आहे. एसटी सेवा बंद असल्याने अनेक प्रवासी टमटम, वडापने प्रवास करीत आहे.
पुणे जिल्ह्यात पूर्वी रोजच्या दोनशे गाड्या ह्या मुक्कामी येत. काही दिवसांपूर्वी शंभर गाड्या सुरू केल्या. मात्र यातील पन्नास गाड्या बंद करण्यात आल्या. आता पन्नास गाड्यांची सेवा सुरू आहे.
पाऊस, खराब रस्ते व ग्रामीण भागात प्रवाशांचा कमी असणारा प्रतिसाद यामुळे बहुतांश एसटी मुक्कामी जाणे बंद झाले आहे. तर दुसरीकडे गावांत एसटी येत नसल्याने वडाप, टमटमचा व्यवसाय जोरात सुरू आहे.
बॉक्स १
शहरी भागात जाणाऱ्या गाड्या फुल्ल :
स्वारगेट व वाकडेवाडी बस स्थानकावरून सुटणाऱ्या बहुतांश लांब पल्ल्याच्या गाड्यांना चांगला प्रतिसाद लाभत आहे. यात पुणे-सातारा, पुणे-सोलापूर, पुणे -ठाणे, पुणे-कोल्हापूर, पुणे-बोरीवली, पुणे-औरंगाबाद, पुणे-नाशिक आदी गाड्यांना चांगला प्रतिसाद लाभत आहे.
बॉक्स २
ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद :
ग्रामीण भागात जाणाऱ्या लालपरीला चांगला प्रतिसाद लाभत आहे. यात दौंड, इंदापूर, कोरेगाव, शिरूर, हवेली आदी भागांत जाणाऱ्या गाड्यांना चांगला प्रतिसाद आहे. याचे भारमान जवळपास ४० ते ४५ इतके आहे. शिवाय पुणे विभागाच्या अन्य आगारातील ग्रामीण भागातल्या गाड्यांना देखील चांगला प्रतिसाद लाभतो आहे.
बॉक्स ३
या गावांना मुक्कामी एसटी बंद :
पुणे विभागाच्या तेरा आगारांपैकी शिवाजीनगर, भोर, वाकडेवाडी व इंदापूर आदी आगराच्या बहुतांश गाड्या मुक्कामी जाणे बंद झाले आहे. यात पिराची वाडी, दहिटणे, कोरेगाव भिवर, पसुरे, पोळे, घोले, घिसरे आदी छोट्या गावांत पूर्वी एसटी गाड्या मुक्कामी जात होत्या. त्या आता बंद झाल्या आहेत.
कोट १
“ग्रामीण भागातील सेवेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. मात्र रात्री मुक्कामी जाणाऱ्या गाड्यांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही. किमान गाडीच्या इंधनांचा तरी खर्च निघाला हवा. तोही मिळत नसल्याने काही ठिकाणच्या मुक्कामी जाणाऱ्या गाड्या बंद केल्या आहेत. तर जवळपास ५० मुक्कामाच्या ठिकाणी एसटी जात आहे.”
- ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे