लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: वर्षानुवर्षे जतन केलेल्या वस्तू हा एक प्रकारचा खजिना असतो. हा खजिना असलेली शहरातील वस्तू संग्रहालये प्रेक्षकांसाठी कधी उघडणार, असा प्रश्न आहे. ‘न्यू नॉर्मल’मध्ये चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु होत असताना वस्तू संग्रहालयांबाबत मात्र सरकारने निर्णय घेतलेला नाही.
जवळपास नऊ महिने उलटल्यानंतरही वस्तू संग्रहालये बंदच आहेत. मुळातच या संग्रहालयांमधली गर्दी तुरळक असते. त्यात इतक्या महिन्यांच्या बंदीमुळे संग्रहालयांचे अर्थकारण बंद पडण्याची वेळ आली आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने काही संग्रहालयांच्या चालकांशी संवाद साधला.
राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संचालक सुधन्व रानडे म्हणाले की, संग्रहालयांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यांना उत्पन्नाची शाश्वती नाही. सरकारने यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे. त्यांची अवस्था फारच बिकट आहे. आता ती बंद ठेवण्यात आली आहेत. ती वाचवण्याची चिंता मोठी आहे. कोरोनामुळे पुण्याबाबत भीतीदायक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे लवकर चालू केली तरीही लोक संग्रहालयात कधी येतील हे सांगता येत नाही. आम्ही सर्व संचालक लवकरच परवानगी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहोत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संग्रहालये सुरू करण्यासाठी परवानगी मिळण्याचा अंदाज आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाच्या संचालिका संजिवनी मुजुमदार यांनी सांगितले की, संग्रहालये चालू करण्याबाबत मुंबईच्या संचालकांकडूनही शासनाला पत्र पाठवण्यात आले आहे. परंतु सरकार अजूनही दखल घेत नाही. आमच्या संग्रहालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या वस्तू, त्यांची सर्व माहिती जतन करून ठेवली आहे. सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण कित्येक लोकांचे फोन आले. पण संग्रहालय उघडता आले नाही. आम्ही सर्व नियम पाळून आणि खबरदारी घेण्यास तयार आहोत. फक्त सरकारची परवानगी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहोत.
सायकल म्युझिअमचे विक्रम पेंडसे म्हणाले, “हॉटेलसोबतच संग्रहालये उघडण्यास परवानगी मिळेल. असे आम्हाला वाटत होते. पण अजूनही दखल घेतली जात नाही. या महिन्यात सरकारने परवानगी द्यावी. प्रमुख संग्रहालये पत्रव्यवहार करत आहोत.”