परदेशी लस लवकरच उपलब्ध होतील असे सरकार तर्फे सांगितले जात असले तरी ते कधी याचे काहीच स्पष्ट उत्तर मिळत नाहीये. आणि त्यामुळेच आता एका पुणेकराने थेट फायझर चा सीईओनाच पत्र लिहिले आहे. विशेष म्हणजे फायझर ने तातडीने त्यांचा पत्राला उत्तर दिले असून भारतसरकार कडून अद्याप परवानगी न मिळाल्याने उशीर होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकार कडून परदेशी लसी जुलै महिन्यात येतील आणि त्यानंतर लसीकरण प्रक्रियेत दिलासा मिळेल असं सांगितलं जात आहे. फायझर ची परिणामकारकता लक्षात घेता अनेक लोक ही लस घेण्यासाठी थांबले देखील आहेत. मात्र ही लस सामान्यांना नेमकी कधी उपलब्ध होईल याचा स्पष्ट अंदाज अद्याप आलेला नाहीये.
याच पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रकाश मिरपुरी यांनी थेट फायजर चा सीईओना पत्र लिहीत याचे स्पष्टीकरण मागितले आहे. विशेष म्हणजे फायझर चे शेअर होल्डर असणाऱ्या मिरपुरीना फायझर चे संचालक आणि सीईओ अल्बर्ट बऊर्ला यांनी तातडीने उत्तर देखील दिले आहे.
याविषयी लोकमतशी बोलताना मिरपूरी म्हणाले ,"मला कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. त्यानंतर मी फायझर, मॉडर्ना चे शेअर विकत घेतले. माझा कुटुंबाला सर्वोत्तम लस मिळावी अशी माझी इच्छा होती. त्यामुळे ती नेमकी कधी उपलब्ध होणार हे जाणून घेण्यासाठी मी थेट सीईओना संपर्क साधला. त्यांनी २४ तासांचा आत मला उत्तर पाठवले. जर एका आंतरराष्ट्रीय कंपनी चा सीईओ एका भागधारकाला २४ तासांचा आत उत्तर पाठवत असेल तर सरकार चा बाबतीतही हे वेगाने व्हायला हवे. सरकार ने तातडीने पावलं उचलायला हवीत असे मला वाटते "
दरम्यान मीरपुरी यांना पाठवलेल्या उत्तरात फायझर ने आम्हाला देखील भारतात लवकरात लवकर लस उपलब्ध करून द्यायची इच्छा आहे. मात्र सरकार कडून परवानग्या मिळाल्या नाहीयेत. आम्ही आमचा बाजूने पूर्ण प्रयत्न करत आहोत आणि सरकार बरोबर करार व्हावा यासाठी शक्य ती सर्व पावले उचलत आहोत. मात्र एखाद्या देशाला लसींचा साठा पुरवणे हा मात्र त्या देशाचाच आरोग्य विभागाचा सल्ल्याने घेतलेला निर्णय असतो असे म्हणले आहे.