पुणे : पुणे - लोणावळा या मार्गावरच लोकल धावते. तर पुणे - दौंड आणि पुणे - सातारा या मार्गांवर डेमू धावते. परंतु, पुणे - दौंड मार्गावर आता पुणे - लोणावळाप्रमाणे मेमू लोकल गाड्या सुरू करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. परंतु, प्रवाशांच्या दृष्टीने डेमू आणि मेमूपेक्षा लोणावळा - दौंड आणि लोणावळा - साताऱ्यापर्यंत लोकलचा विस्तार झाल्यास प्रवाशांच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल.
वाढती प्रवासी संख्या आणि शहरीकरणाचा होणारा विस्तार पाहता, पुणे-लोणावळा लोकलचा विस्तार थेट दौंड आणि सातारापर्यंत होणे गरजेचे आहे. परंतु, त्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या उपनगरीय लोकल सेवेचा विस्तार व्हावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. परंतु, केवळ वेळकाढूपणामुळे गेल्या ४४ वर्षांत लोकल सेवा फक्त पुणे - लोणावळा या मार्गावर सुरू आहे.
पुणे शहर आणि उपनगराचा विस्तार व कोंडीचा विचार करता लोकलचा विस्तार झाला पाहिजे. सध्या शिवाजीनगर आणि पुणे स्थानकांतून लोकल धावतात. त्यामुळे पुणे शहराच्या बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना गाड्या बदलाव्या लागतात. त्यात गाडी वेळेवर नसेल तर स्थानकावर वाट पाहत थांबावे लागते. याचा विचार करून लोकलचा प्रवास मर्यादित न ठेवता थेट लोणावळा ते दौंड करणे गरजेचे आहे.
लोकलच्या विस्ताराने पुणे स्थानकावरील ताण कमी होईल :
सध्या पुणे स्थानकावर सहा फलाट आहेत. परंतु, ये-जा करणाऱ्या गाड्यांची संख्या दीडशेवर आहे. त्यात काही लोकल गाड्या शिवाजीनगर आणि पुणे स्थानक येथून सुटतात. त्यामुळे शहरात येणाऱ्या आणि हडपसर, उरळी कांचन, लोणी काळभोर, सासवड, जेजुरी या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची अडचण होते. परिणामी वेळही वाया जातो. यामुळे लोकल सेवा थेट दौंड आणि सातारापर्यंत विस्तार झाला तर पुणे स्थानकावरील ताणही कमी होण्यास मदत होईल.
रेल्वेचे उत्पन्न वाढेल...
लोकल सेवेचा थेट पुणे -दौंड - लोणावळा सेवा सुरू केल्याने प्रवाशांच्या सोयीचे होऊन प्रवाशांना दिलासा मिळेेल. परिणामी रेल्वेला उत्पन्न मिळेल. तसेच दोन मोठ्या शहरांना जोडल्यामुळे उपनगरातील प्रवाशांची संख्या वाढेल. त्यामुळे पुणे शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
सध्या पुणे-लोणावळादरम्यान लोकल सेवा सुरू आहे. पुणे-दौंड लोकलसाठी प्रस्ताव पाठविले आहे. रेल्वेचा विस्तार या धोरणाबाबत रेल्वे बोर्डाच्या निर्णयानुसार पुढील अंमलबजावणी होईल.
- डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, पुणे