पुणे:दक्षिण पुण्यात लागोपाठ तीन दिवस झालेल्या धुवांधार पावसाने महापूर येऊन हजारो लोकांचे नुकसान झाले़. २५ हून अधिक जणांचा बळी गेला़. हजार कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान सुमारे दोन तास झालेल्या पावसाने केले़. त्यावेळी शहरातील आत्पकालीन व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती़. मात्र, त्याचबरोबर इतका मोठा पाऊस होईल, आपण काळजी घेतली पाहिजे, अशी कोणतीही सुचना ना हवामान खात्याने दिली, ना महापालिकेच्या आत्पकालीन विभागाने नागरिकांना सांगितली़. पुणेहवामान विभागातील अधिकाऱ्यांनी आम्ही गेले तीन दिवस पुण्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वेबसाईटवर दिला होता, इतकेच सांगून मोकळे झाले आहेत़. भारतीय हवामान विभाग हा सार्क देशांसाठी नेडल एजन्सी म्हणून हवामानाची माहिती देण्याचे काम करतो़. जर देशातील लोकांनाच वेळच्या वेळी अतिवृष्टीचा अलर्ट हवामान विभाग देऊ शकत नाही. तर, इतर देशांना ते किती नेमकी माहिती देत असेल, याविषयी शंका घेण्यास वाव आहे़. आज माहितीच्या क्षेत्रात संपर्काची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत़ फेसबुक, ट्विटरद्वारे एकाच वेळी हजारो, लाखो लोकांपर्यंत पोहचता येते़. पुणे हवामान विभागाला मात्र, याचे वावडे असल्याचे दिसून येत आहे़. दिवसभरात एका अंदाज तोही वेबसाईटवर टाकला की आपले काम संपले़. लोकांनी ते पाहून त्यातून जो काही अर्थ काढता येईल, तो काढावा, अशी मानसिकता आता उपयोगाची नाही़. तुम्ही लोकांना उत्तरदायी असले पाहिजे़. पुणे शहरात सलग तीन दिवस रात्री मुसळधार पाऊस पडत होता़. या काळात पुण्यासाठी पुणे हवामान विभागाने २४ तासात एकदा दिलेला अंदाज पाहिल्यास काय दिसते, हे पाहिले तर, असे दिसते की, २३ सप्टेंबर रोजी ‘हलक्या पावसाची शक्यता.’ २४ सप्टेंबर रोजी ‘ढंगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता़’ २५ सप्टेंबर रोजी ‘मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता़’ अशा संपूर्णपणे अतिशय मोघम स्वरुपाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता़. या अंदाजानुसार पाऊस पडेल का, किती पडेल, कोणत्या भागात पडू शकेल, कधी पडण्याची शक्यता आहे, असा कोणताही नेमकेपणा त्यात दिसून येत आहे़. हे म्हणजे वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली अशा वृत्तीतून दिलेला अंदाज आहे़. हवामान विभागातील अधिकारी सांगतात की, हवामानात सातत्याने बदल होत असतात़. त्यांच्याकडे डॉप्लर रडारपासून अनेक सोयी सुविधा असताना त्यात दर काही मिनिटांनी बदलत्या हवामानाची माहिती येत असते़. त्यांनी जर ठरले तर दर तासाला विशेषत: महत्वाच्या दिवशी ते संपर्कांची वेगवेगळ्या साधनांचा वापर करुन ते लोकांपर्यंत पोहचवू शकतात़. मुंबई हवामान विभागाकडून दर तीन तासाचा अलर्ट दिला जातो़ पुणे हवामान विभाग हे कधी करणार?......पुण्यात ६० मिमी पाऊस पडला तरी तो येथील भौगोलिक रचनेमुळे धोकादायक ठरु शकतो, असे हवामान विभागाचे अधिकारी सांगतात़. मग, पुण्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज असताना त्यादृष्टीने पुणेकरांना अलर्ट करुन त्याचे महत्व जाणून देण्याचे काम त्यांचेही आहे़. हवामान विभागाने आपल्यावरील लोकांचा विश्वास वाढविण्याचे काम दुसरे कोणी येऊन करणार नाही़ त्यांनाच हे काम करावे लागणार आहेत़.
पुणे हवामान विभाग कधी कात टाकणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 7:37 PM
दक्षिण पुण्यात लागोपाठ तीन दिवस झालेल्या धुवांधार पावसाने महापूर येऊन हजारो लोकांचे नुकसान झाले़.....
ठळक मुद्देअत्याधुनिक साधनांचा वापर करुन लोकांना कधी देणार माहिती