राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने प्रसिध्द केलेला अध्यादेश मागे घेण्यात आला. मात्र, स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने राज्यातील काही जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. परंतु, पुणे जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यास परवानगी मिळालेली नाही. पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाने जिल्ह्यातील शाळा सुरू कराव्यात, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदनही दिले आहे. मात्र, शिक्षण विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पदाधिकाऱ्यांची यासंदर्भात अलीकडे कोणती बैठकही झाली नाही.
विद्यार्थी, पालक, शिक्षक व मुख्याध्यापक ऑनलाईन शिक्षणाला वैतागले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा केव्हा सुरू होतात, याचीच सर्वांना प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील ज्या भागात गेल्या काही महिन्यांपासून एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही, अशा ठिकाणच्या शाळा सुरू करण्याची मागणी मुख्याध्यापक संघातर्फे करण्यात आली असल्याचे मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी सांगितले.
-----------------
जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थी संख्या
पहिली - १,९०,०६१
दुसरी- १,९२,५९२
तिसरी- १,९०,१३१
चौथी- १,९०,५७५
पाचवी - १,८६,९९६
सहावी - १,८३,२१४
सातवी - १,७७,८७३
आठवी - १,७०,८२२
नववी - १,६७,८६२
दहावी - १,४४,३८४
----
राज्य शासन किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शाळा सुरू करण्यासंदर्भातील कोणताही आदेश प्राप्त झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या नाहीत. सध्या ऑनलाईन पध्दतीनेच शाळा सुरू आहेत. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार जिल्हातील शाळा सुरू करण्याबाबत कार्यवाही केली जाईल.
- स्मिता गौड, प्राथमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
---------