लोणावळा (पुणे) :मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपघातांची ही मालिका थांबणार तरी केव्हा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाट परिसरात दैनंदिन अपघात सुरू आहेत. गेल्या वीस वर्षांमध्ये या मार्गावर हजारो अपघात होऊन असंख्य नागरिकांना जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण जायबंद झाले. या एक्स्प्रेस वेवरील अपघात रोखण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग करण्यात आले. मात्र, कोणत्याही बाबींना समाधानकारक यश न आल्याने या मार्गावर सातत्याने अपघात व वाहतूक कोंडी होत आहे.
राज्यातील कोणातरी एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा अपघात झाल्यानंतर येथे यंत्रणांना जाग येते. चौकशांच्या फेऱ्या सुरू होतात व पुढे काहीच होत नाही. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे हा ९४ किलोमीटर अंतराचा एक्स्प्रेस-वे आहे. कळंबोली ते किवळे असा हा मार्ग असून, या जलदगती मार्गामुळे मुंबई व पुणे ही दोन्ही राजधानींची शहरे कमीत कमी वेळात जोडली जावीत, नागरिकांचा वेळ वाचावा व वाहतूक कोंडीची समस्या सुटावी, यासाठी या मार्गाची निर्मिती करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र यापैकी काहीही झाले नसून एक्स्प्रेस-वे हा सततच्या वाहतूककोंडीमुळे कासवगती झाला आहे. सततचे अपघात यामुळे एक्स्प्रेस-वे हा मृत्यूचा सापळा बनला आहे.
‘लेन कटिंग’ ही या मार्गावरील सर्वात मोठी समस्या
एक्स्प्रेस-वेवरील अपघातांना वाहनांचा अतिवेग व लेन कटिंग हे जबाबदार असल्याचा निष्कर्ष काही वर्षांपूर्वी काढण्यात आला होता. उर्से व खालापूर टोलनाका या ठिकाणी वाहन चालकांची जागृती करण्यात आली. मात्र, तरीदेखील वाहनचालक नियमांकडे दुर्लक्ष करत वाहने चालवत असल्याने ‘लेन कटिंग’ ही या मार्गावरील सर्वात मोठी समस्या बनली आहे.