पुणे : महापालिका निवडणुकांच्या आरक्षण सोडतीनंतर प्रभागनिहाय मतदार याद्या १७ जूनऐवजी २३ जून रोजी अंतिम करण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाने महापालिकांना दिलेल्या वेळापत्रकात बदल केला असून, नव्या वेळापत्रकानुसार, २३ जूनपर्यंत प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी मुदत दिली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत नुकतीच पार पडली. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम करण्याचे आदेश दिले होते. या आदेशातील वेळापत्रकानुसार १७ जून रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार हाेत्या. परंतु त्या आता २३ जून रोजी प्रसिध्द होणार आहेत. तर २३ जून ते १ जुलै या कालावधीत या याद्यांवर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर ९ जुलैला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
राज्यातील १४ महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३१ मे रोजी अनुसुचित जाती, जमाती व महिला आरक्षणाची सोडत झाली. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने सर्व महापालिकांना प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे आदेश दिले होते.
महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचनांनंतर १३ मे रोजी प्रभाग रचना अंतिम करण्यात आली. प्रभाग रचना अंतिम करताना प्रभागांमध्ये बदल झाले असून मतदार संख्येतही बदल झाले आहेत.