पिंपरी : मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीला पावित्र्य आहे. ज्ञानोबा-तुकोबांमुळे इंद्रायणीला भक्तितीर्थाचे महत्त्व प्राप्त झाले. तर तुळापूर येथील संगमावर भीमा-इंद्रायणी संगमावर छत्रपती शंभूराजेंची समाधी आहे. त्यामुळे कुरवंडे या उगमापासून ते तुळापूर भीमा संगमापर्यंत भक्ती आणि शक्तीचे सिंचन नदीवर झाले. मात्र, मानवी हस्तक्षेप आणि नागरीकरण, वसाहती वाढल्याने नदी प्रदूषणात भर पडत आहे. गावे, नगरपालिका आणि महापालिकांच्या दुर्लक्षाने तीर्थरूपी इंद्रायणी गटारगंगा होत आहे. जीवनदान देणारे तीर्थ विष होत आहे. इंद्रायणी नदीवरून श्रेयवाद आणि नदी सुधारचे ढोल बडविणाऱ्यांना माय इंद्रायणीचे दु:ख कधी समजणार? असा प्रश्न पर्यावरणवादी संघटनांना पडत आहे.
पुणे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी इंद्रायणी ही महत्त्वाची नदी आहे. त्या नदीने महाराष्ट्राला संत ज्ञानदेव आणि संत तुकाराम महाराज हे दोन संत दिले. विश्वात्मकतेचा प्रवाह येथूनच सुरू झाला. तो पूर्ण विश्वात शेकडो वर्षे वाहत आहे. मावळातील कुरवंडेगावातून सुरू होणारी इंद्रायणी नदी ही पिंपरी-चिंचवड शहरातून थेट तुळापूर येथील भीमा नदीस मिळते. नदी उगम ते संगमादरम्यानच्या गावांमध्ये होणारे नदी प्रदूषण वाढतच आहे. नदीचा हा प्रवाह सुमारे १०३ किलोमीटरचा आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरातून ही नदी एकूण लांबी २०.८५ किलोमीटर आहे.
गावांचे सांडपाणी थेट नदीत
इंद्रायणी नदीची पाहणी केली असता उगमापासूनपर्यंत सुरुवातीस लोणावळा आणि भांगरवाडी परिसर आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण वाढले आहे. बहुतांश नाले थेटपणे नदीत सोडले आहेत तसेच पुढे वलवण भागातही मोठ्या प्रमाणावर नागरीकरण वाढले आहे. मळवळी, कामशेत, कान्हे, टाकवे, कातवी, तळेगाव दाभाडे, आंबी, इंदोरी, शेलारवाडी, कान्हेवाडी, किन्हई, देहूगाव, येलवाडी, खालुंब्रे, निघोजे, तळवडे, चिखली, मोई, मोशी, चऱ्होली, आळंदी, धानोरे, वडगाव शिंदे, मरकळ तुळापूर भागातील नैसर्गिक नाले हे थेटपणे नदीत सोडले आहेत.
एसटीपी प्लॉट नावालाच
लोणावळा, तळेगाव दाभाडे, देहूगाव, आळंदी अशा चार नगरपालिका, पिंपरी-चिंचवड ही महापालिका क्षेत्र आहे. मात्र, गावठाणांच्या भागात प्रक्रिया न करताच पाणी नदीत सोडले जात आहेत. तसेच महापालिका आणि नगरपालिकांनी सुरू केलेल्या मैलाशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने काम करीत नसल्याचे दिसून येत आहेत. नैसर्गिक नाल्यांतील पाणी नदीत सोडले जात आहेत. तसेच काही गावांतील यंत्रणा बंद पडली आहे.