हडपसर : सासवड रस्त्याच्या कडेला टेम्पोत भाजी विकणाऱ्यांवर अतिक्रमण विभागाने कारवाई केली. वाहतुकीस अडथळा होत असल्याने ही कारवाई गरजेची होती. मात्र, कारवाई झालेल्या वाहनचालकांना दंड आकारून त्यांची वाहने परत देणे आवश्यक असताना अतिक्रमण विभागाकडून दिरंगाई केली जात आहे. हडपसर परिसरातील सासवड रस्त्यावर अनधिकृतपणे भाजीविक्री करणाऱ्यांवर अतिक्रमण विभागाने कारवाई केली. साधारणपणे या कारवाईस आठवडा होत आला असून, अद्याप या विक्रेत्यांची वाहने विभागाकडून परत देण्यात आली नाहीत. क्षेत्रीय अधिकारी, सहायक आयुक्त सुनील गायकवाड आणि कर्मचारी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.संबंधित अधिकाऱ्यांना मोबाईलवर संपर्क साधला असता, ते कार्यालयीन वेळेत अनेक वेळा फोन स्वीकारतच नाहीत. तर अनेक वेळा मीटिंग सुरू आहे, फाईल अजून आपल्यापर्यंत पोहोचली नाही, फाईल पोहोचल्यानंतर दंडाची पावती बनवून देतो, अशी उत्तरे अधिकाऱ्यांकडून मिळत आहेत. यासंबंधी वाहनचालकांना नीट मार्गदर्शनदेखील केले जात नाही. वाहनचालकांवर नोटाबंदीच्या तुटवड्यामध्ये उपजीविकेचे साधनच हडपसर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी अडकवून ठेवल्यामुळे उपासमार व गाडीच्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे, हे कळत नाही, असे वाहनचालक सांगत आहेत. थ्री व्हीलर, हातगाड्या इत्यादी वाहनांवर ही कारवाई करण्यात आली. टेम्पोमालकांनी वाहनाची सर्व कागदपत्रे क्षेत्रीय कार्यालयामध्ये जमा केली आहेत. त्या कागदपत्रांची तपासणी व दंड आकारण्यास अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आहे. वाहनचालक सहा दिवसांपासून हेलपाटे मारत आहेत. अधिकारी क्षेत्रीय कार्यालयात कधी येणार, याची चौकशी करून कार्यालय बंद होईपर्यंत थांबून रिकाम्या हाताने घरी जात आहेत. कार्यालयातील काही कर्मचारी मदतीसाठी पुढे येतात, तर काही विनाकारण त्रास देत असल्याचे विक्रेते सांगतात.
वाहने परत कधी मिळणार?
By admin | Published: January 13, 2017 3:26 AM