रस्त्यात थांबताना किंवा वळण घेताना पाठीमागून येणारी वाहने दिसण्यासाठी आरसे महत्वाचे असतात. त्यामुळे अपघात टाळता येऊ शकतात. पण दुचाकीस्वारांसह यंत्रणांकडूनही त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. आरसा नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाईची तरतूद कायद्यामध्ये आहे. कायद्यामध्ये दुचाकीस्वारांना हेल्मेटचा वापरही बंधनकारक आहे. पण त्यावर कारवाईच होत नसल्याने बहुतेक जण वापर करत नव्हते. कारवाईचा बडगा उगारल्यानंतर हेल्मेटचा वापर वाढू लागला. त्याचप्रमाणे वाहनांना आरसा नसल्यासही कारवाई करण्याचा वाहतूक पोलिस व परिवहन विभागाला अधिकार आहे. पण अद्यापपर्यंत केवळ आरसा नाही म्हणून वाहनचालकांवर कारवाई झालेली नाही. शहरात प्रामुख्याने अनेक दुचाकीस्वारांकडून आरशाचा वापर केला जात नाही.
--------------
कारवाई नाही
आरसे नसलेल्या वाहनांवर पोलिस तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई करण्यात आलेली नाही. वाहनचालकाकडे आवश्यक कागदपत्रे नसणे, सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहणे, हेल्मेट नसणे, नो पार्किंग, वेग, ट्रिपल सीट, नो एंट्री, कर्कश हॉर्न, वाहनांचे आवाज, फॅन्सी नंबर प्लेट, मद्यपान करून वाहन चालविणे आदी नियमांसाठी वाहतूक पोलिस आरटीओकडून कारवाई केली जात आहे. पण कारवाईसाठी पकडलेल्या वाहनाला आरसा नसल्यास ते पाहिलेही जात नसल्याची वस्तुस्थिती आहे.
--------------
दुचाकीचालकांना हे बंधनकारक
- वाहन चालविण्याचा परवाना
- वाहन नोंदणी कागदपत्रे
- पोल्युशन अंडर कंट्रोल (पीयुसी) सर्टिफिकेट
- हेल्मेट
- विमा
-------------------
परिवहन विभागाकडील वायुवेग पथकांकडून मार्गांवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते. पण केवळ आरसा नसलेल्या वाहनांवर कारवाईसाठी स्वतंत्र मोहिम राबविली नाही. रस्ते सुरक्षेच्यादृष्टीने आरसाही महत्वाचा आहे. अन्य नियमांचे उल्लंघन करणारे वाहन पकडल्यानंतर आरसा नसल्यास त्याचाही दंड वसूल केला जातो.
- संजीव भोर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
-------------------
शहरातील दुचाकींची संख्या (३० नोव्हेंबरपर्यंत) : ३० लाख
------------------