पुणे - केंद्र सरकार निष्क्रिय आहे. महागाईमुळे जनता त्रासली आहे. नोटाबंदीपासून ते जीएसटी पर्यंत केंद्राचा एकही निर्णय जनहिताचा ठरलेला नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. समविचारी पक्षांनी एकत्र येऊन केंद्र सरकारला पर्याय दिला पाहिजे असंही ते बोलले आहेत. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं तीन वर्षांपुर्वी विचारत होते, मात्र आता महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे हे दिसतंय असा टोला शरद पवारांनी राज्य सरकारला लगावला.
काही कार्यक्रमांसाठी म्हणून पवार दोन दिवस पुण्यात मुक्कामी आहेत. शिवदर्शन येथील लक्ष्मीमाता मंदीरातील कार्यक्रमानंतर शनिवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना शरद पवार बोलले की, 'नोटाबंदीने जनता होरपळली आहे. लहान व्यावसायिक मंदीमुळे कंटाळले आहेत. यापुर्वी कधीही अशी स्थिती नव्हती. त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. केंद्र सरकार ते करायला तयार नाही'.
'सरकारला महाईगाईवर नियंत्रण ठेवला आलेले नाही. त्यांचा प्रत्येक निर्णय जनतेला आगीत टाकणारा ठरला आहे. पेट्रोल, डिझेल यांची भाववाढ थांबवणे सरकारला शक्य होते, मात्र त्यांनी ते केलेले नाही. आता सगळ्या निर्णयामागचे गणित जनतेलाही कळते. महागाईमुळे सामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. त्याचा विचार करून सरकारी निर्णय झाले पाहिजेत, मात्र तसे दिसत नाही. अशा वेळी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. तसे केले तरच चांगला पर्याय निर्माण होऊ शकतो', असे मत पवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसची याचसाठी एक बैठक ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत ठेवली आहे. पक्षाचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी बैठकीला उपस्थित असतील. त्यात देशातील, राज्यातील सध्याच्या स्थितीवर विचार करण्यात येईल असे पवार यांनी सांगितले.