शिक्षण हक्क कायद्यामुळे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी अनुत्तीर्ण होत नाहीत. त्याचप्रमाणे नववीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनासुध्दा परीक्षेची एक संधी दिले जाते. त्यामुळे नववीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी आहे. पुणे जिल्ह्यातील नववीतील १ लाख ६५ हजार २७२ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ४९ हजार ८१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ४ हजार ९९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. मात्र, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ११ हजार विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेशच घेतला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नववीत उत्तीर्ण होऊनही दहावीचा परीक्षा अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ११ हजार ३६१ एवढी आहे.
-----------------------------
शाळांचा निकाल शंभर टक्के लागावा, या उद्देशाने काही शाळा विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करत असल्याचा घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. पालकांनी यापूर्वी अनेक वेळा याबाबत शिक्षण विभाकडे तक्रार केली आहे. परंतु, काही शाळांनी शंभर टक्के निकालासाठी अभ्यासक्रमात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले आहे. त्यातच कोरोनामुळे शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. मग विद्यार्थी कमी का झाले? नववीतील पटसंख्या अधिक दाखवली गेली का? असे प्रश्न निर्माण होत आहेत.
----------------
“बालविवाह,आर्थिक चणचण किंवा स्थलांतर आदी कारणांमुळे नववीतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते,असे बोलले जात असले तरी कोरोनामुळे केवळ स्थलांतराच्या कारणामुळे ही विद्यार्थिसंख्या कमी होण्याची शक्यता आहे. इतर कारणे असतील तर ती प्रत्येक विद्यार्थ्याशी संपर्क साधून जाणून घ्यावी लागतील.”
-डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
-----------------------------
“स्थलांतराच्या कारणामुळे जिल्ह्यातील विद्यार्थिसंख्या कमी झाली आहे. त्याबाबत शिक्षण विभागाकडून तालुकानिहाय सर्वेक्षण करण्यात आले. स्थलांतरामुळेच विद्यार्थी कमी होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी पुढील अभ्यासक्रमास प्रवेश घेतला नसावा.”
-अपर्णा वाखारे, माध्यमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
--------------------------
इयत्ता नववीतील उत्तीर्ण विद्यार्थिसंख्या : १,४९,८१२
दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : १,३८,१४२
-----------------------