श्रीकिशन काळे
पुणे : वन विभागातर्फे व्याघ्र प्रगणना करण्यात आली असून, त्यातंर्गत शहरातील टेकड्यांवरील वन्यजीवांच्या नोंदही घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये टेकड्यांवर फक्त ससे आणि मोरांचेच दर्शन झाले आहे. पुर्वीच्या काळी भरपूर वन्यजीवांचे वैभव टेकडीवरून नामशेष झाल्याचे स्पष्ट झाले. सलग डोंगर रांगा राहिल्याने नसल्याने प्राण्यांसाठीचा कॉरिडोरही राहीला नाही. पुर्वी कोल्हेकुई ऐकू यायची, आता तर मोरांचे केकाटणेही कमी झाले आहे. माणसं वाढली आणि वन्यजीव मात्र कमी होत आहेत.
प्रगणनेचा कार्यक्रम गेल्या आठवड्यात तयार करण्यात आला होता. त्यानुसार १५ ते २० जानेवारी या कालावधीत ही प्रगणना करण्यात आली आहे. तीन दिवसांत १५ किलोमीटर अंतर पायी चालत नोंदी केल्या. वन्यजीव अभ्यासक डॉ. संजीव नलावडे यांनी टेकड्यांवरील पुर्वीच्या वन्यजीव वैभवाविषयी माहिती दिली. त्यांनी १९८० च्या दशकात फ्रेंड्स ऑफ ॲनिमल संस्थेकडून पुणे जिल्ह्यातील वन्यजीवांचा सर्व्हे केला होता. त्यात प्रामुख्याने पुण्यातील टेकड्यांवरही विशेष अभ्यास केला होता. तेव्हा विपुल प्रमाणात वन्यजीव दिसून येत असत. या विषयी डॉ. नलावडे म्हणाले,‘‘ पर्वती, तळजाई, सिंहगड, वेताळ टेकडीवर अभ्यास करून वन्यजीवांची नोंद केली होती. त्यात चौशिंगा, तरस, कोल्हे, माळठिसकी (इंडियन गॅझेल), घोरपड, ससे, मोर मोठ्या प्रमाणावर दिसायचे. कारण तेव्हा टेकडीभोवती वस्ती कमी होती. आता टेकड्यांच्या बाजुने वस्ती वाढली आणि सलग कॉरिडोर पण राहिला नाही. त्यामुळे वन्यजीवांचा अधिवास कमी झाला.’’
‘‘पुर्वी ससे खूप होते. पण कुत्री वाढली आणि त्यामुळे सशांची संख्या कमी झाली. चौसिंगा वेताळ टेकडीवर काही वर्षांपुर्वी दिसत असे. परंतु, त्याची पिल्लं कुत्री खायची. म्हणून त्यांचीही संख्या कमी झाली. आता गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे दर्शन झाले नाही. घोरपड खूप होत्या. त्या कमी झाल्या,’’ असे डॉ. नलावडे म्हणाले.
''शहरातील टेकड्यांवरून कोल्हेकुई ऐकू यायची. आता तर कोल्हे नाहीतच. तरस शहराच्या आजुबाजुला दिसतात. वेताळ टेकडीवर चौसिंगा होता. तोही नाही दिसत. कुत्रे वाढल्याने ससेही कमी झालेत. घोरपडी नाहीत. बिबटे मात्र शहराच्या अवतीभोवती कधी-कधी दिसतात. सिंहगड पायथ्याला, फुरसुंगी, गुजरवाडी, कात्रज परिसरात, दिवे घाटात बिबटे येतात असे वन्यजीव अभ्यासक डॉ. संजीव नलावडे यांनी सांगितले.''