अशोक खरात
खोडद: जुन्नर तालुक्यातील आंब्यांची सातवाहन काळातही नोंद आहे. औरंगजेबला पाठवलेल्या पत्रात देखील या आंब्यांचा केलेला उल्लेख आढळतो. विशेष म्हणजे इतक्या वर्षानंतरही जुन्नरच्या आंब्यांची गोडी आजही जशीच्या तशी आहे. उत्कृष्ट चव असलेल्या या आंब्यांना बाजारपेठेत विशेष मागणी आहे.
जुन्नर तालुक्यातील आंबा जून महिन्यात विक्रीसाठी बाजारपेठेत येतो. या भागात आजही ५० ते ७० वर्ष झालेल्या आंब्याच्या चांगल्या उत्पादक बागा आहेत. तालुक्यात प्रामुख्याने येणेरे, तांबे, काले, दातखिळवाडी, पारुंडे, वैष्णवधाम, निरगुडे, बोतार्डे, शिंदे राळेगण, खामगाव, माणिकडोह, बेलसर, चिंचोली, वडज, सुराळे, वाणेवाडी, धालेवाडी, कुसुर, गोद्रे, काटेडे, तेजुर, पुर, शिरोली, कुकडेश्वर इत्यादी गावांमधील शेतकरी आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. या भागातून येणारा आंबा उशिरा येणारा असला तरी हा आकाराने मोठा असतो. या भागातील माती आणि हवामानामुळे या आंब्याची उत्कृष्ट चव लागते.
सन १६१० मध्ये मलिक अंबरने जुन्नरला राजधानी करुन विविध फळ बागांचा विकास केला. हबशी सरदार मलिक अंबर याने जुन्नरच्या पूर्वेला एक टोलेजंग महाल बांधून परिसरात आंबे लावले होते. या बागेला पाणीपुरवठा करण्यासाठी जवळच मातीचा बांध घालून बादशाहा तलाव बांधला. म्हणूनच कालांतराने हा भाग आफिजबाग म्हणुन ओळखला जाऊ लागला. काही भाग अमरापुर म्हणुन नोंद आहे.
मोघल कालखंडात जुन्नर प्रांतात औरंगजेब बादशाहाची ३५० झाडांची सरकारी आमराई होती. अशी सेतू माधवराव पगडी लिखित 'मोघली दरबारातील बातमीपत्र' या ग्रंथात नोंद असल्याचे इतिहास संशोधक प्रा.लहू गायकवाड यांनी सांगितले.
मूहरमखान हा फळांच्या सरकारी बागांचा दारोगा ( व्यवस्था पाहणारा ) होता. त्याने औरंगजेबला पत्राद्वारे जुन्नर मधील आंब्यांविषयी पुढीलप्रमाणे कळविले - "जुन्नर परगाण्याजवळ इरसाली आंब्याची साडेतीनशे झाडे आहेत. आता झाडांना मोहर आला आहे. या झाडांची निगा राखण्यासाठी कोणाची तरी नेमणूक व्हावी."
यावर औरंगजेब बादशाहाने कळविले की, "आंबे तयार झाल्यावर काळजीपूर्वक पाठवावेत. जुन्नर साठी रहमतुल्ला यास पाठविले आहे. आंब्याचा मोहर गळू नये यासाठी काळजी घ्यावी. यावरून जुन्नरचा आंबा औरंगजेबाच्या दरबारी जात होता हे स्पष्ट होते. तसेच या आंबा बागेवर खुद्द औरंगजेबाचेही जातीने लक्ष होते हे ही जाणवते असल्याचे त्यांनी सांगितले.
"जुन्नर परिसरातील आंबा लागवडी चा इतिहास हा सातवाहन काळापासून म्हणजे २ हजार वर्षांपासून सुरू होतो.आंब्याची ओळख चिनी प्रवासी ह्यु - एन-त्संग याने भारताला करुन दिली असे म्हणतात,पण या अगोदर सहाशे वर्ष सातवाहन साम्राज्यातील 'गाथा सप्तशती' मध्ये या आंब्याबाबत अनेक गाथांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. पोर्तुगीजांनी गोव्यात हापूस लागवड करण्याच्या आधीपासूनच जुन्नर मध्ये इरसाल, कलमी , रायवळ या जातीचे आंबे होते याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत." अस ते म्हणाले.