पुणे : मी जिथे जातो तिथे भारतीय जनता पक्षाचा पराभव होतो असा इतिहास आहे. सध्या मी महाराष्ट्रात आहे त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला नक्की पराभवाला सामोरं जावं लागेल असा विश्वास भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी पुण्यात व्यक्त केला.
पुण्यात त्यांनी समता भूमीला भेट दिल्यावर वार्ताहरांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मी अशांतता पसरवत नाही. मात्र, सध्या देशात आंबेडकरवादी आणि बहुजनांचा आवाज चेपला जात आहे. मी नेता नसून कार्यकर्ता आहे. आनंदराज आंबेडकर, रामदास आठवले यांना सभा घेण्यास परवानगी दिली असेल तर मला का नाकारली जात आहे याचे उत्तर मिळणे आवश्यक आहे.मी निवडणुकीचे राजकारण करणार नाही मात्र डॉ.आंबेडकर, कांशीराम यांचे राजकारण करणार असेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी कोरेगाव भीमा येथे जाण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान आझाद यांच्या सभेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परवानगी नाकारली असल्याने त्यांची सभा रद्द झाली आहे. मात्र आज त्यांनी सकाळी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केले तसेच समता भूमीचे दर्शन घेतले.