मंगेश पांडे, पिंपरीनिवडणूक म्हटले, की मतदारांना पैशाचे आमिष दाखवून मते मिळविण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील असतात. यावर अंकुश ठेवण्यासाठी निवडणूक विभागाकडून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जाते. या तपासणीत अनेकदा मोठी रोकडही आढळते. मात्र, सापडलेल्या रकमेचे काय होते, रक्कम कुठे जाते, याबाबत नागरिकांनाच प्रश्न पडतो.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून पोलिसांना दिले आहेत. पोलीस व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाकडून ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. संशयित वाहनचालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. उमेदवारांचे निवासस्थान व संपर्क कार्यालय परिसरात निवडणूक विभागाचे अधिक लक्ष आहे. या परिसरात जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवली जात आहे. संशयित वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. ओळखपत्र पाहू, तुमच्या परिसरात राहणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तीचे नाव सांगा या प्रश्नांना वाहनचालकाला सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नांची उत्तरे देताना अडखळल्यास अधिकच सखोल चौकशी केली जात आहे. वाहन तपासणीत मोठी रकम पकडल्याचा तपशील संबंधिताने पोलिसांना सादर करावा लागतो. सीआरपीसी कलम ४१ (ड) अंतर्गत बेहिशेबी अथवा संशयास्पद रक्कम जप्त करण्याची तरतूद आहे. दरम्यान, रक्कम बाळगणाऱ्या व्यक्तीने समाधानकारक उत्तरे न दिल्यास अथवा त्याच्याकडे व्यवहाराची कागदपत्रे उपलब्ध नसल्यास, रक्कम जप्त केली जाते. रकमेचा प्राप्तिकर भरलेला आहे का, याची पडताळणी केली जाते. त्यानंतर न्यायालयात कागदपत्रे सादर करून रक्कम परत मिळते. तर ती रक्कम निवडणुकीशी संबंधित असल्याची माहिती समोर आल्यास निवडणूक विभागामार्फत कारवाई केली जाते.
निवडणूक काळात पकडलेली रक्कम जाते कुठे?
By admin | Published: October 06, 2014 6:26 AM