पुणे : परिवहन विभागाने राज्यभरात ऑनलाईन पीयुसी (पोल्युशन अंडर कंट्रोल) प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. मात्र, ऑनलाईन पीयुसी केंद्रांची संख्या खुप कमी तसेच नव्याने सुरू झालेल्या केंद्रांची माहिती वाहनचालकांना उपलब्ध होत नसल्याने शोधाशोध करावी लागत आहे. याबाबत काही वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रांची संख्या वाढविण्याबरोबरच त्याची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील कारचे पुण्यात दोन पीयुसी केंद्रावरून पीयुसी देण्यात आले होते. याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाल्यानंतर परिवहन विभागाने बोगस पीयुसीला आळा घालण्यासाठी सर्व पीयुसी केंद्र ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दि. २४ सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्यानुसार पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत असलेली जुन्या पध्दतीची सुमारे पावणे तिनशे पीयुसी केंद्र एका दिवसात बंद करण्यात आली. त्यादिवशी पुणे कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात केवळ २५ नवीन ऑनलाईन केंद्रांची नोंदणी झाली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यातील काही केंद्र सुरूही झाली नव्हती.या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होऊन दहा दिवस उलटल्यानंतरही त्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही. केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, पुणे जिल्ह्यामध्ये शुक्रवार (दि. ४) पर्यंत केवळ ५७ आॅनलाईन पीयुसी केंद्र सुरू झाली आहेत. त्यामध्ये पुणे आरटीओ क्षेत्रात ३९, पिंपरी चिंचवडमध्ये १७ आणि बारामती कार्यक्षेत्रात केवळ १ केंद्र आहे. पुणे शहरातच वाहनांची संख्या ३८ लाखांहून अधिक आहे. या वाहनांसाठी सध्या केवळ ३९ पीयुसी केंद्र असल्याने वाहनचालकांना पीयुसी प्रमाणपत्र घेण्यासाठी केंद्रांची शोधाशोध करावी लागत आहे.सहकारनगरमधील एका वाहनचालकाने ' लोकमत' शी बोलताना याबाबत नाराजी व्यक्त केली. सातारा रस्ता परिसरात पीयुसी केंद्राबाबत ७ ते ८ ठिकाणी चौकशी केली मात्र कुणालाही काही माहिती नाही. गाडी जुनी झाल्याने नव्याने पासिंग करायचे आहे. त्यासाठी पीयुसी गरजेचे आहे. पण नवीन केंद्र कुठे आहेत, याची माहिती मिळत नाही, असे त्यांनी सांगितले. ...............वाहनांशी संबंधित बहुतेक कामांना आरटीओमध्ये पीयुसी प्रमाणपत्र आवश्यक असते. या प्रमाणपत्राशिवाय कामे होत नाहीत. तसेच वाहतुक पोलिस, आरटीओकडूनही पीयुसी तपासणी केली जाते. प्रमाणपत्र नसल्यास वाहनचालकांना दंड आकारण्यात येतो. पण सध्या पीयुसी केंद्र पुरेशी नसल्याने वाहनचालकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संकेतस्थळावर यादी उपलब्धऑनलाईन पीयुसी केंद्रांची माहिती परिवहनच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या संकेतस्थळावरील ऑनलाईन सेवा विभागात पीयुसी लिंकवर केंद्रांची यादी उपलब्ध आहे. त्यामध्ये आरटीओनिहाय पीयुसी केंद्रांच्या नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी माहिती नमुद करण्यात आली आहे. वाहनचालकांना केंद्र शोधण्यासाठी सध्यातरी हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. ऑनलाईन पीयुसी केंद्रांची माहिती परिवहन संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वाहनचालकांना त्यावरून माहिती सहज उपलब्ध होईल. तसेच पीयुसी केंद्रांची नोंदणी सुरू असून ही केंद्र वाढत जातील. - विनोद सगरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी