लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी पिंपरी-चिंचवड सहकारी बँकेच्या ३८ पैकी ३२ कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. बँकेची सेवा ही अत्यावश्यक असल्याने यातील काही जण निवडणुकीच्या प्रशिक्षणाला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीचे कामकाज करावे की बँकेचे? असा प्रश्न या बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना पडला आहे.
बँक कर्मचाऱ्यांना अन्य कामासाठी नेमताना रिझर्व्ह बँकेची परवानगी आवश्यक असते. निवडणुकीच्या कामकाजाची नियुक्ती मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी गेल्यास बँक कशी चालवायची? असा प्रश्न आहे. याचा विचार व्हावा. अन्यथा कायदेशीर मार्गाने लढू. - शिरीष देशपांडे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सहकारी बँक
इतर विभाग, आस्थापनांचे कर्मचारी घेण्याचा अधिकार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा असतो. संबंधितांच्या कामावर परिणाम होऊ नये ही बाब लक्षात घेऊन कर्मचारी घेतले जातात. एका आस्थापनांचे किती टक्के कर्मचारी घ्यायचे याचे काही नियम नाहीत. - मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी