दुर्गेश मोरे
पुणे : माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना म्हाडा दिल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. महायुतीने त्यांची बोळवण केल्याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीलादेखील या मतदारसंघात अद्यापपर्यंत तोडीस तोड उमेदवार मिळाला नाही. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरूरला आढळरावच उमेदवार असतील, असे स्पष्ट केल्याने आता उपमुख्यमंत्री अजित पवार तडजोड कुठं करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महायुतीत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर, बारामती लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. अजूनही तो कायम आहे. त्याअनुषंगाने बारामतीमध्ये बारामती हायटेक टेक्सटाइलच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. मात्र, उरला प्रश्न तो शिरूरचा. सध्या तरी अजित पवारांकडे शिरूरमध्ये उमेदवार सापडलेला नाही. शिरूरसाठी पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी या मतदारसंघात चाचपणी केली. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांनी शिरूरमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी देखील लावली; पण पार्थ पवारांना अनुकूल असे वातावरण दिसले नाही. शिवाय बारामतीतही घरचाच उमेदवार आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोघांना उमेदवारी कशी द्यायची, लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल, यामुळे पार्थ पवार यांना सध्या तरी ब्रेक लावल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रकृतीच्या कारणाने आधीच आपण लोकसभा लढण्यास इच्छुक नसल्याने स्पष्ट केले आहे. त्यातून विलास लांडे यांचे नाव समोर येते; पण त्यांचाही या मतदारसंघात फारसा प्रभाव पडेल, असे सध्या तरी चित्र नाही.
मावळ आणि शिरूरमध्येच चढाओढ
माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना म्हाडा देऊन त्यांची बोळवण केली की काय, अशी चर्चा सर्वत्र झाली. वास्तविक, गेल्या वर्षभरापासून हे पद घेण्यासाठी आढळरावांची मनधरणी सुरू होती. त्यातूनच हे पद मिळाले. त्यातच जुन्नर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे यांनी शिरूरचे उमेदवार आढळराव-पाटील हेच असतील, असे ठणकावून सांगितले खरे पण त्यांच्या हाती झेंडा कोणाचा असणार, याबाबत मात्र संभ्रम कायम आहे.
अजित पवार गटाकडे कोणताही उमेदवार दृष्टिक्षेपात नसला तरी शिरूरवर दावा ठोकला जात आहे. शिंदे गट आणि भाजपच्या दबावतंत्राने जर आढळराव-पाटील यांच्यासाठी शिरूर सोडला तर आपसूकच अजित पवार गटाकडे मावळ जाईल; पण त्या ठिकाणी सध्या शिंदे गटाचे खा. श्रीरंग बारणे आहेत. तेथेही अजित पवार गटाकडे तगडा उमेदवार नाही. आमदार सुनील शेळके, बापू भेगडे हे लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. एकूणच इथेही अजित पवार गटाची उमेदवाराबाबत बिकट अवस्था सध्या तरी दिसते. त्यामुळे आता तडजोड होणार कशी, याबाबत जिल्ह्याच्या राजकीय पटलावर उत्सुकता आहे.
अधिवेशनानंतर दिल्लीत निघणार तोडगा
महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्येक पक्षाने आपापले मतदारसंघ अगोदरच ठरवून घेतले आहेत. पूर्वी शिंदे गट आणि भाजप होता मात्र, अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने जागा वाटपात मोठा पेच निर्माण झाला आहे. तीन पक्षांमध्ये वाटप करताना काही जागा इकडे तिकडे होणार, हे नक्की. भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील एकही जागा गमवू द्यायची नाही. त्यासाठीच बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना उभे करण्याची व्यूहरचना केली आहे. आता उरलेला जागांसाठी तिढा कायम आहे. हा तिढा सोडवण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना एकत्रित बैठक घेऊन जागा वाटपाबाबत चर्चा करण्यास सांगितले होते. मात्र, तशी चर्चा अद्यापपर्यंत झालेली नाही. त्यामुळे आता राज्याचे २६ तारखेला होणारे अधिवेशन झाल्यानंतर दिल्लीतच तिन्ही प्रमुख नेत्यांबरोबर स्वत: अमित शाह चर्चा करून जागा वाटपाचा तिढा सोडवणार असल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले.