बेल्हा : बेल्हा(ता.जुन्नर) येथील यादववाडी परिसरात भक्ष्याचे पाठलाग करताना सहा वर्ष वयाचा बिबट्या विहिरीत पडला. ग्रामस्थ,पोलीस व वनखात्याच्या कर्मचा-यांनी विहिरीत पिंजरा सोडुन बिबट्या पिंज-यात अलगत अडकला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यादववाडी येथे देवराम पिंगट यांची विहिर आहे. शुक्रवारी (दि. ५ आॅक्टो) पहाटेच्या सुमारास वंदना पिंगट या विहिरीजवळ मोटार चालु करण्यासाठी आल्या असताना त्यांना विहिरीतुन आवाज आला. त्यांनी विहिरीत डोकावुन पाहिले असता बिबट्या मोटारीच्या पाईपाला धरुन बसलेला पाहिला. त्यांनी घरी जावुन सांगितले असता घरच्यांनीही खात्री केल्यावर त्यांना बिबट्या दिसला.त्यांनी ताबडतोब वनखात्याच्या कर्मचा-यांना ही माहिती दिली. वनखात्याच्या कर्मचा-यांनी या ठिकाणी येवुन खात्री केली.या ठिकाणी कुत्र्याचा पाठलाग करताना हा बिबट्या विहिरीत पडला होता.या विहिरीत एक कुत्रेही मेलेले दिसत होते. वनखात्याच्या कर्मचा-यांनी सर्व प्रथम या पाण्यात पडलेल्या बिबट्यासाठी एका जाडीला चारी बाजुने दोर बांधले. त्यानंतर माणिकडोह येथुन पिंजरा आणण्यात आला. त्यानंतर त्या पिंज-याला चारी बाजुने दोर बांधुन पिंजरा पाण्यात जाडीजवळ सोडला.त्यानंतर लगेचच तो बिबट्या अलगतपणे पिंज-यात अडकला. सहा ते सात तास बिबट्या पाण्यातच होता.तो खुपच थकलेला दिसत होता.मात्र पिंज-यात अडकल्यानंतर तो बिबट्या लोकांवर गुरगुरत होता.हा बिबट्या मादी जातीचा असुन सहा वर्ष वयाचा आहे. बिबट्या पहाण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.या बिबट्याला माणिकडोह येथे हलविण्यात आले आहे.याठिकाणी वनकर्मचारी डी.डी.फापाळे, जे.टी.भंडलकर,बी.एस.शेळके,पोलीस पाटील बाळकृष्ण शिरतर,पोलीस व डॉ.ढोरे यांचे विशेष पथकाने विशेष सहकार्य केले.
जुन्नर येथे भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला बिबट्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 4:36 PM
बेल्हा (ता.जुन्नर) येथील यादववाडी परिसरात भक्ष्याचे पाठलाग करताना सहा वर्ष वयाचा बिबट्या विहिरीत पडला.
ठळक मुद्देसहा ते सात तास बिबट्या पाण्यातच