मंचर (पुणे) : सावजाचा पाठलाग करताना बिबट्याचा बछडा विहिरीत पडल्याची घटना आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागापूर भागात सकाळी घडली आहे. एक तासाच्या प्रयत्नानंतर विहिरीत पिंजरा सोडून या बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात वन विभागाला यश आले आहे. सदर बिबट्याच्या बछड्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले असून रात्री त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले जाणार आहे.
आंबेगाव तालुका आणि बिबटे यांचे जणू एक समीकरणच तयार झाले आहे. बिबट्याचा हल्ला, पाळीव प्राण्यांना ठार मारणे, दिवसा असो किंवा रात्र नागरिकांना तसेच शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होणे हे नित्याचेच बनले आहे. वाढत्या बिबट्याच्या संख्येमुळे शेतकऱ्यांपुढे आपल्या पाळीव प्राण्यांच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी निर्माण झाली आहे. त्यातच आज सावजाचा पाठलाग करताना बिबट्याचा बछडा विहिरीत पडला.
बुधवारी सकाळी सहा वाजता नागापूर येथील कुमार दिनकर गायकवाड यांच्या शेतात काम करणारे हरिदास जयराम यलभर हे वीजपंप सुरु करण्यासाठी विहिरीवर गेले. त्यांना विहिरीतून मोठ्याने आवाज आला. त्यांनी विहिरीत डोकावले तर त्यांना बिबट्या दिसला. त्या दरम्यान विहीरीत एक रानमांजर होते. दरम्यान थोड्या वेळाने रानमांजर पाईपाच्या साह्याने सुखरूपपणे वर निघून गेले. हरिदास यलभर यांनी सरपंच गणेश यादव, सुनील शिंदे व वन विभागाला घटनेची माहिती दिली.
वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वनमंडलाधिकारी प्रदिप कासारे, वनरक्षक सूर्यकांत कदम व रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी पिंजरा विहीरीत सोडून बछड्याला सुखरूपपणे वर काढले. पकडलेला बिबट बछडा हा अंदाजे एक वर्ष वयाचा असून त्याला अवसरी घाटीतील वन उद्यानात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. रात्री सदर बछड्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले जाणार आहे अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी दिली.