- पांडुरंग मरगजे
धनकवडी (पुणे) : चिंतामणी ज्ञानपीठ शिक्षण संस्थेच्या गड संवर्धन प्रकल्पाला मोठं यश मिळालं असून, किल्ले तोरणावर सफाई करताना तीन शिवकालीन भुयारी मार्ग उजेडात आले आहेत. धनकवडी, आंबेगाव पठार येथील चिंतामणी ज्ञानपीठतर्फे सामाजिक दायित्व योजनेंतर्गत तोरणा किल्ला दत्तक घेतलेला आहे. तोरणा किल्ल्याची स्वच्छता आणि जपणूक ज्ञानपीठाने नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून केली जात आहे. या किल्ल्यावर पूर्वी पाच भुयारी मार्ग होते, असे जाणकार इतिहास तज्ज्ञांकडून सांगितले जायचे. मात्र, हे भुयारी मार्ग नेमके कुठे आहेत, याचा उलगडा अद्याप झालेला नव्हता. आता मात्र या पाचपैकी तीन भुयारी मार्ग नव्याने उजेडात आले असून, हा नवा खजिना शिवप्रेमींसाठी खुला झालेला आहे.
तोरणा गडाच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर चिंतामणी ज्ञानपीठ शिक्षण संस्थेतर्फे नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसमोर तोरणा गडाच्या एकूणच साफसफाईचे मोठे आव्हान होते. ‘गडवाट स्वच्छता’ मोहिमेदरम्यान वाळंजाई दरवाजा मार्ग मोकळा केला होता. आता नव्याने तीन भुयारी मार्ग सापडल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे.
छत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या माझ्या जन्मभूमीची सेवा करण्याची संधी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या परवानगीने मिळत असल्याचे विलक्षण आत्मिक समाधान असून, छत्रपती शिवरायांचे पाय ज्या मातीला लागले त्या मातीची सेवा करण्याची संधी यानिमित्ताने मिळत असल्याने आम्ही खरोखरीच भाग्यवान असल्याचे चिंतामणी ज्ञानपीठचे अध्यक्ष आप्पासाहेब रेणुसे यांनी सांगितले.
तोरणा गडावर सफाई सेवा करत असताना यापूर्वीही अनेक ऐतिहासिक गोष्टी कर्मचाऱ्यांना सापडलेल्या आहेत. त्यामध्ये दगडी खांब, बुरुज आहेत. बुधला माचीवरील चित्ता दरवाजा मोकळा करताना एक तोफगोळा, दरवाज्याची लोखंडी कडी, मातीच्या भांड्याचे काही अवशेष आढळले आहेत. ऐतिहासिक नाणी, तोफगोळे अशा शिवकालीन वस्तू सापडल्या होत्या. आता नव्याने उजेडात आलेल्या तीन मार्गांमुळे शिवरायांच्या इतिहासावर अधिक प्रकाश पडायला मदत होणार आहे.
- आप्पासाहेब रेणुसे, अध्यक्ष, चिंतामणी ज्ञानपीठ