पुणे : उंड्री येथील अतूर नगर सोसायटीमधील दुकानात अनधिकृतरित्या एल. पी. जी. गॅस भरत असताना झालेल्या स्फोटात दोन जण जखमी झाले आहेत. या दुकानात मोठ्या एल पी जी सिलेंडर मधून छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचे काम हे दोन जण करीत होते. सोमवारी रात्री बाराच्या सुमारास दुकान बंद करून आतमध्ये गॅस भरण्याचे काम करीत होते. त्यावेळी गॅस गळती झालेली त्यांना लक्षात आली नाही व अचानक गळती झालेल्या गॅसने पेट घेतला व स्फोट झाला.
स्फोटाची तीव्रता एवढी होती की, दुकानाचे शटर उचकटून निघाले. यानंतर बिल्डिंग मधील रहिवाशी यांनी अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दलाचे जवान आल्यावर त्यांना तीन गॅस गळती होत असलेले तीन मोठे एलपीजी गॅस सापडले . त्यांनी त्वरित गॅसगळती बंद केली. तसेच गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे २० छोटे सिलेंडर आढळून आले. दुकानाच्यावर सदनिका असल्याने दुकानातील सिलेंडरचे स्फोट झाले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. जखमी व्यक्तींना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात भरती करण्यात आले.